कोकण रेल्वेकडून गणेशभक्तांचे रत्नागिरीत जल्लोषात स्वागत
गणपती बाप्पाच्या जयघोषात, तुतारीच्या ललकारीत भाविकांना शुभेच्छा

रत्नागिरी : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांचे आणि भाविकांचे रत्नागिरी रेल्वे स्थानकात अत्यंत उत्साहात आणि पारंपरिक वातावरणात स्वागत करण्यात येत आहे. सध्या रत्नागिरीत मुंबईसह उपनगरांतून हजारो भाविक विशेष ट्रेन आणि नियमित गाड्यांनी दाखल होत आहेत.
रेल्वे स्थानकात उतरणाऱ्या गणेशभक्तांचे स्वागत तुतारीच्या निनादात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात केले जात आहे. पारंपरिक वेशभूषेत तुतारीवादक तुतारी वाजवून भाविकांना शुभेच्छा देत आहेत. या भव्य आणि भक्तिमय स्वागतामुळे दीर्घ प्रवास करून आलेल्या चाकरमान्यांचा थकवा पार निघून जात असून स्थानकात एक वेगळाच उत्साह आणि भक्तिमय माहौल पाहायला मिळत आहे.
भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून त्यांना पाण्याचे वाटप तसेच मार्गदर्शन केले जात आहे. पोलीस कर्मचारी सुरक्षेची काळजी घेत प्रवाशांना सुरळीत बाहेर पडण्यास मदत करत आहेत. गावी जाण्यासाठी रेल्वे स्थानकातून पुढे एसटी बसेस आणि इतर वाहनांची सोय करण्यात आली आहे.
आपल्या लाडक्या बाप्पाच्या उत्सवासाठी गावी पोहोचलेल्या भाविकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि उत्साह वाखाणण्याजोगा असून सबंध रत्नागिरी शहर व परिसर आता गणेशोत्सवाच्या रंगात न्हाऊन निघाला आहे.



