मिलिंद कदम देवरुख पंचायत समितीत सहाय्यक लेखाधिकारीपदी रुजू

चिपळूण : गुहागर पंचायत समितीत २०२३ सालापासून अतिरिक्त सहाय्यक लेखाधिकारी पदाचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळणारे खेरशेत गावचे सुपुत्र मिलिंद काशिराम कदम हे नुकतेच देवरुख पंचायत समितीत पदोन्नतीने सहाय्यक लेखाधिकारीपदी रुजू झाले. अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कर्मचारी यांनी त्यांचे स्वागत करीत शुभेच्छा दिल्या.
पदोन्नतीनिमित्त देवरुख पंचायत समितीच्या सभापती शर्वरी वेल्ये, उपसभापती प्रफुल्ल बाईत, गटविकास अधिकारी आनंद लोकरे, सहाय्यक गटविकास अधिकारी अक्षय पाटील, कृषि अधिकारी परेश सुर्वे, पंचायत समितीतील अधिकारी व कर्मचारी यांनी श्री. मिलिंद कदम यांचे स्वागत केले. १९९१ साली संगमेश्वर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कडवई येथे कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) म्हणून मिलिंद कदम यांच्या शासकीय सेवेस प्रारंभ झाला. त्यानंतर २००५ साली चिपळूण पंचायत समिती येथे कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) या पदावर ते रुजू झाले. २०१३ साली संगमेश्वर तालुक्यातील बुरंबी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कनिष्ठ सहाय्यक (लिपिक) पदभार त्यांनी सांभाळला.
२०१६ साली रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या वित्त विभागात कनिष्ठ सहाय्यक (लेखा) या पदावर ते रुजू झाले. २०१७ साली वरिष्ठ सहाय्यक (लेखा) पदावर त्यांना पदोन्नती मिळाली. जिल्हा परिषदेत उत्तम सेवा बजावल्यानंतर २०१९ साली गुहागर पंचायत समिती येथे बदलीने वरिष्ठ सहायक (लेखा) या पदावर ते रुजू झाले. २०२३ साली त्यांना गुहागर पंचायत समिती येथे कनिष्ठ लेखाधिकारीपदी पदोन्नती मिळाली. आता श्री. कदम देवरुख पंचायत समितीत पदोन्नतीने सहाय्यक लेखाधिकारीपदी रुजू झाले आहेत. सहाय्यक प्रशासन अधिकारी सुनील लोंढे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी आनंद शिगवण, शिक्षक नेते बबन बांडागळे, श्रीकृष्ण जागुष्टे, अशोक भालेकर, प्रकाश कांबळे आदींनी मिलिंद कदम यांची भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.



