जपानी पर्यटकाला भावला जैतापूरचा गणेशोत्सव
गावकऱ्यांच्या आपुलकीचे केले कौतुक : मंडळाच्या वतीने परदेशी पाहुण्याचे स्वागत

राजापूर : जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याला जपानहून आलेल्या पर्यटकाने आवर्जून उपस्थिती लावत जैतापूरच्या गणेशोत्सवाचा आनंद घेतला. गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेदरम्यानचे भक्तिमय वातावरण, उत्साह आणि भाविकांची श्रद्धा पाहून हा पर्यटक भारावून गेला. यावेळी त्यांनी गणेशमूर्ती तसेच प्रतिष्ठापना सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओही आवर्जून काढले.
यावेळी उपस्थित असलेल्या मंडळाचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थांशी संवाद साधताना त्यांनी जैतापूरमधील गणेशोत्सवाबाबत उत्सुकतेने माहिती जाणून घेतली. आपण गेल्या दोन वर्षांपासून या परिसरात येत असून, यंदा प्रथमच जैतापूरमधील गणेशोत्सव प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले. जैतापूरच्या ग्रामस्थांनी दाखवलेली आपुलकी आणि आदरातिथ्यही या पर्यटकाला विशेष भावले. शहरातील आणि गावातील लोकांच्या वागणुकीत फरक जाणवतो. शहराच्या तुलनेत गावातील माणसे अधिक प्रेमळ, मनमोकळी आणि आपुलकीने वागतात, असे निरीक्षण त्यांनी व्यक्त केले. जैतापूरकरांनी आपले केलेले आदरातिथ्य मनापासून आवडल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, आपला चेहरा व चेहऱ्याची ठेवण येथील नागरिकांपेक्षा वेगळी असल्याने काहीजण कुतूहलाने आपल्याकडे पाहतात. त्यामुळे काही वेळा थोडासा संकोच वाटत असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. मात्र, त्याचवेळी जैतापूरकरांनी दाखवलेल्या प्रेमळ व आपुलकीच्या वागणुकीबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.
परदेशातून आलेल्या पाहुण्याने जैतापूरच्या गणेशोत्सवाचा प्रत्यक्ष अनुभव घेत स्थानिक संस्कृती, श्रद्धा, परंपरा आणि माणुसकीचे केलेले कौतुक हा उपस्थितांसाठीही आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण ठरला. मंडळाच्या वतीने या जपानी पर्यटकाचे औचित्यपूर्ण स्वागत करून सन्मान करण्यात आला.
यावेळी जैतापूरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष गिरीश करगुटकर, पत्रकार राजन लाड, खजिनदार श्रीकृष्ण राऊत, सचिव सुनील करगुटकर, मनीष करगुटकर, महेश नारकर, रेशम लाड, राजेंद्रप्रसाद राऊत, गजानन करमळकर यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.



