मनसेच्या वतीने आमदार भास्कर जाधव व जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांचा सत्कार
गुहागरमध्ये शिवसेना मनसे युतीचे संकेत

आबलोली (संदेश कदम) : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) गुहागर विधानसभा क्षेत्र यांच्या वतीने शिवसेना नेते व आमदार भास्कर जाधव व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उत्तर जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांचा शृंगारतळी येथील मनसे संपर्क कार्यालयामध्ये गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर व सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते भगवी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
आमदार भास्कर जाधव व शिवसेना जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी मनसेच्या संपर्क कार्यालयामध्ये दिलेल्या भेटीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये गुहागरमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट व महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची युती होणार हे निश्चित मानले जात आहे.
यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी देखील सर्व मनसे पदाधिकारी यांचे भरभरून कौतुक केले. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी हे आमदार भास्कर जाधव यांच्या विरोधामध्ये निवडणुकीला उभे होते; परंतु आज प्रमोद गांधी यांच्या संपर्क कार्यालयामध्ये आमदार भास्कर जाधव यांचा झालेला सत्कार एक वेगळीच दिशा निर्माण करेल, अशीच आशा सर्वांकडून व्यक्त होत आहे.
यावेळी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख विक्रांत जाधव यांनी सांगितले की, “मी जरी शिवसेनेचा जिल्हाप्रमुख असलो आणि तुम्ही जरी मनसे पक्षाचे असलात तरी देखील आपल्या तालुक्यातून निवडून गेलेले तरुण नेतृत्व आज जिल्हाप्रमुख सारखी मोठी जबाबदारी स्वीकारतेय, त्यांचा सत्कार आपण केला पाहिजे या भावनेतून तुम्ही मला मनसे कार्यालयामध्ये बोलावून माझा यथोचित सत्कार केला त्याबद्दल मी सर्व मनसे सैनिकांचे आभार व्यक्त करतो.”

“या मतदारसंघाचे वातावरण खेळीमेळीचे व अजिबात वैराचे न करता सर्वांनी एकोप्याने कसे राहता येईल हेच आमदार भास्कर जाधव यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे, त्यांच्या काळामध्ये या मतदारसंघांमध्ये एकही जातीय दंगल झाली नाही, सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची कार्यपद्धती आहे, निवडणुका संपल्यानंतर आपण जनतेच्या असतो या भावनेतून त्यांनी या मतदारसंघांमध्ये काम केले आहे. आज राज ठाकरे व उद्धव ठाकरे एकमेकांना भेटत जरी असले तरी त्यांच्यामुळे आपण एकत्र भेटतोय याचा काही भाग नाही. आपण अनेक वर्षे एकमेकांना भेटत आहोत. आपण सर्वांनी मैत्रीपूर्ण वातावरण ठेवले पाहिजे आणि यापुढेही सर्वांनी एकत्रित राहू या,” असे आवाहन शेवटी विक्रांत जाधव यांनी केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते व ज्येष्ठ शिवसैनिक विनायक मुळे, माजी सरपंच संजय पवार यांच्यासह उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुका सचिव प्रशांत साठले, गुहागर शहर अध्यक्ष अभिजीत रायकर, शृंगारतळी शहर अध्यक्ष वेदांत देवळेकर, प्रसिद्धी माध्यम प्रमुख दीपक जोशी, उपतालुका अध्यक्ष जितेंद्र साळवी, अमित खांडेकर, प्रसाद विखारे, माजी शहराध्यक्ष नवनाथ साखरकर, विभाग अध्यक्ष स्वप्नील कांबळे, नीलेश पावरी, सुनील मूकनाक, विजय शिंदे, मंगेश धामणस्कर, प्रमोद राऊत, प्रवीण लांजेकर, सुजन सुवरे, साक्षी सुवरे आदी उपस्थित होते.



