मुख्य बातमी

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियान जिल्हास्तरीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

रत्नागिरी : ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन ३० नोव्हेंबर रोजी लोकनेते शामराव पेजे सभागृह, जिल्हा परिषद रत्नागिरी येथे करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती अस्मिता केंद्रे, उपाध्यक्ष विलास चाळके, जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकारी व सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती वैदेही रानडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सागर पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ भास्कर जगताप, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र गावडे, जिल्हा माता बालसंगोपन अधिकारी डॉ. माधव ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यशाळेचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने करण्यात आले. राज्यस्तरावरून एबीटीएस स्वयंसेवी संस्थेचे राजू गुत्ते तसेच कोल्हापूर परिमंडळाच्या पीएमयु श्रीमती प्रीती साबळे व सूरज कांबळे यांनी प्रशिक्षण व मार्गदर्शन केले.

कार्यशाळेच्या प्रास्ताविकात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांनी ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियान शासन निर्णयानुसार विविध निर्देशंकांची माहिती देऊन जिल्ह्यातील सर्व विभागांनी समन्वयाने काम करून उपलब्ध असलेल्या विविध आरोग्य योजना व आरोग्यसेवा नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवाव्यात. गावातील सर्व घटकांचा सहभाग नोंदवून आरोग्यविषयक सुधारणा करण्याबरोबरच अभियानाशी संबंधित रेकॉर्ड कीपिंग व दस्तऐवजीकरण व्यवस्थित ठेवणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषद उपाध्यक्ष विलास चाळके यांनी पंचायत समिती स्तरावर व ग्रामपंचायत स्तरावरही अशा प्रकारच्या कार्यशाळा आयोजित करून अभियानाबाबत व्यापक जनजागृती व कृती आराखडा तयार करणे आवश्यक असल्याचे सांगितले.परिसर स्वच्छता, स्वच्छ पाणी, कुपोषित बालकांचे आरोग्य यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर विशेष लक्ष देऊन सर्व विभागांच्या समन्वयातून काम केल्यास रत्नागिरी जिल्हा निश्चितपणे आरोग्यसंपन्न जिल्हा होण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्रत्येक विभागाचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असून जिल्हा परिषदेच्या सर्व विभागांनी अधिक समन्वयाने काम केल्यास अभियानाचा परिणाम अधिक प्रभावी होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. ‘आरोग्यसंपन्न शरीरात निरोगी मन वास करते’ या विचारानुसार समाजातील सर्व घटकांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य बळकट करण्यावर भर देणे आवश्यक आहे. कुपोषित बालकांचे आरोग्य, किशोरवयीन मुला-मुलींचे आरोग्य, असंसर्गजन्य आजारांचे प्रभावी व्यवस्थापन, एचपीव्ही लसीकरण तसेच विविध आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी यावर विशेष देऊन ग्रामपंचायत स्तरावर सर्व विभागांनी समन्वय साधून एकत्रितपणे काम केल्यास आरोग्यसंपन्न गावाचे उद्दिष्ट साध्य करता येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

अध्यक्षीय भाषणात जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती अस्मिता केंद्रे यांनी ‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ अभियान केवळ अभियानाच्या कालावधीपुरते मर्यादित न ठेवता प्रत्येकाने सकारात्मक व आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करणे आवश्यक असल्याचे सांगितले. आरोग्य ही केवळ आरोग्य विभागाची जबाबदारी नसून समाजातील प्रत्येक घटकाच्या सहभागातून निरोगी व आरोग्यसंपन्न समाज निर्माण करता येईल व पुढे यातूनच आरोग्यसंपन्न गाव व जिल्हा होईल, असे त्यांनी नमूद केले.

राज्यस्तरीय प्रशिक्षकांकडून शासन निर्णयानुसार अभियानाची उद्दिष्टे, कार्यपद्धती, गाव व तालुकास्तरावरील नियोजन, विविध विभागांमधील समन्वय, कृती आराखडा तयार करण्याची पद्धत तसेच आवश्यक रेकॉर्ड कीपिंग याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विविध विषयांवर प्रात्यक्षिके घेऊन सहभागींचा सक्रिय सहभाग नोंदविण्यात आला. तालुकानिहाय गट तयार करून सरपंच, ग्रामसेवक, जिल्हा परिषद सदस्य व पदाधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त करून अभियानाबाबत अभिप्राय नोंदविले.

या कार्यशाळेस जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती व सदस्य, सरपंच, गटविकासअधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, विस्तार अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, समुदाय आरोग्य अधिकारी, आशा गटप्रवर्तक, आरोग्य सेवक सेविका यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दिवसभर चाललेल्या या जिल्हास्तरीय कार्यशाळेतून मिळालेले मार्गदर्शन तालुकास्तरीय कार्यशाळांच्या आयोजनासाठी उपयुक्त ठरणार असून, प्रत्येक तालुक्यात पुढील टप्प्यात तालुकास्तरीय कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. या माध्यमातून गावनिहाय व तालुकानिहाय कृती आराखडे तयार करून अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येणार आहे.

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आरोग्य विभागासह जिल्हा परिषदेचे सर्व विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, लोकप्रतिनिधी, शासकीय यंत्रणा आणि नागरिक यांच्या समन्वयातून सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याचा निर्धार या कार्यशाळेत करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!