रत्नागिरीत ९ ऑक्टोबरला जिल्हास्तरीय डाक पेन्शन अदालत
निवृत्तीवेतनधारकांनी ६ ऑक्टोबरपर्यंत तक्रार अर्ज पाठविण्याचे आवाहन

रत्नागिरी : अधीक्षक डाकघर यांच्या रत्नागिरी विभागीय कार्यालयाच्या वतीने बुधवारी (९ ऑक्टोबर) दुपारी ३ वाजता विभागीय डाक कार्यालय, रत्नागिरी येथे जिल्हास्तरीय पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
या पेन्शन अदालतीमध्ये सेवानिवृत्त डाक कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीवेतनाशी संबंधित तक्रारींवर प्रत्यक्ष सुनावणी होऊन त्यांचे निवारण केले जाणार आहे. ज्या तक्रारींचे निवारण मागील ३ महिन्यांत झालेले नाही, केवळ अशाच प्रकरणांची दखल या अदालतीत घेतली जाईल. मात्र, वारसा हक्क/उत्तराधिकार यांसारखी नीतिगत किंवा धोरणात्मक स्वरूपाची प्रकरणे यामध्ये विचारात घेतली जाणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
संबंधित निवृत्तीवेतनधारकांनी आपले तक्रार अर्ज अधीक्षक डाकघर, विभागीय कार्यालय, रत्नागिरी – ४१५६१२ यांच्या नावे सादर करावेत. हे अर्ज ६ ऑक्टोबरपर्यंत किंवा तत्पूर्वी कार्यालयास पोहोचतील अशा बेताने पाठवावेत. विहित मुदतीनंतर (६ ऑक्टोबरनंतर) प्राप्त होणाऱ्या अर्जांवर या अदालतीत कोणताही विचार केला जाणार नाही, असे अधीक्षक डाकघर, रत्नागिरी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.



