देव, घैसास, कीर महाविद्यालयात प्राध्यापक विकास कार्यक्रम

रत्नागिरी : भारत शिक्षण मंडळाच्या देव, घैसास, कीर कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने चार दिवसीय प्राध्यापक विकास कार्यक्रम झाला.
समारोपाच्या दिवशी संशोधन पत्रिकेची निवड व प्रकाशन रणनीती या विषयावर मार्गदर्शक म्हणून डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई उपस्थित होते. या सत्राने शैक्षणिक प्रकाशनासाठी स्पष्ट मार्गदर्शक आराखडा प्रदान केला. ज्यात संशोधन पेपर आणि इतर प्रकाशनांमधील फरक समजून घेण्यापासून ते योग्य नियतकालिक निवडणे आणि पीअर-रिव्ह्यू प्रक्रियेचा सामना करणे समाविष्ट होते. यात हस्तलिखिताचा दर्जा सुधारणे, शोध निबंधातील नकार सकारात्मकतेने हाताळणे आणि अपयशी संशोधन देखील उपयुक्त असते हे समजून घेण्यावर भर देण्यात आला.
डॉ. सुरेंद्र ठाकूरदेसाई यांच्या हस्ते सहभागी प्राध्यापकांना प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. महाविद्यालयाच्या प्र. प्राचार्य मधुरा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम उत्साहात झाला. या वेळी उपप्राचार्य वसुंधरा जाधव व प्राध्यापक उपस्थित होते. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा. विनय बावदाने यांनी अहवाल सादर केला. सूत्रसंचालन प्रा. स्मार्था कीर यांनी केले.


