आर्टिकल

नामदार उदय सामंत यांचे मोलाचे सहकार्य; सायबर क्राईमविरुद्धचा लढा अखेर यशस्वी

बँक ऑफ इंडियाच्या सहकार्याने पाच लाखांहून अधिक रक्कम परत जमा : कष्टाचा पैसा परत मिळवण्यासाठी केलेल्या संघर्षाची ही एक सत्यकथा!

दिनांक २५ जुलै रोजी माझा मित्र धीरज याच्या बँक खात्यातून अचानक २५ हजार त्यानंतर दोन लाख आणि पुन्हा दोन लाख अशा व्यवहारांसह एकूण सुमारे पाच लाख ८७ हजारांची रक्कम डेबिट झाली. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे त्याला काय करावे, हे सुचत नव्हते. त्याने मला फोन केला आणि घाबरलेल्या आवाजात विचारले, “राजेश, आता काय करायचं? काहीतरी बघ!”

मी क्षणाचाही विलंब न करता बँक ऑफ इंडियाच्या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधला आणि त्याचे खाते तातडीने फ्रीझ करण्याची विनंती केली. बँकेच्या ऑनलाइन सेवा विभागानेही तातडीने कार्यवाही करून खाते फ्रीझ केले. त्यांचे मनापासून आभार मानून मी धीरजला याची माहिती दिली. तेव्हा कुठे त्याच्या जिवात जीव आला!

त्यानंतर सायबर क्राईमच्या १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांची प्रक्रिया आणि ऑनलाइन सिस्टीम इतकी गुंतागुंतीची वाटली की माझ्यासारख्या सुशिक्षित व्यक्तीलाही अडचणी आल्या. मग गावातील सामान्य माणसाचे किंवा मोबाईल व ऑनलाइन प्रक्रिया सहज हाताळता न येणाऱ्या व्यक्तीचे काय होत असेल? हा प्रश्न मनात आला.

हेल्पलाइनवरून अपेक्षित मदत न मिळाल्याने अखेर सायबर क्राईमच्या वेबसाइटवर तक्रार नोंदवली.

जुन्या ओळखीचे नाते आणि बँकेची तत्पर मदत!

माझे बँक ऑफ इंडियामधील पहिले खाते जयगड शाखेत उघडले होते. त्या वेळी धीरज कुमार हे बँकेचे मॅनेजर होते. अनेक वर्षे बँकेत व्यवहार केल्यामुळे आमची ओळख आणि मैत्रीही झाली होती. मी त्यांना फोन करून संपूर्ण प्रकार सांगितला आणि मदतीची विनंती केली. त्यांनी तातडीने मार्गदर्शन करत धीरजला शाखेत येऊन सायबर इन्शुरन्ससाठी अर्ज करण्यास सांगितले.

धीरज मुंबईत होता. त्याला बोलावून घेण्यात आले आणि दुसऱ्याच दिवशी तो मुंबईहून रत्नागिरीला आला. आम्ही बँकेतील आवश्यक प्रक्रिया पूर्ण केली. या संपूर्ण प्रक्रियेत बँक ऑफ इंडियाच्या प्रियांका कुमारी यांनी मोलाची मदत केली. आवश्यक कागदपत्रे वेळेवर ऑनलाइन अपलोड करण्यापासून ते सायबर इन्शुरन्सचा अर्ज वेळेत दाखल करण्यापर्यंत त्यांनी विशेष सहकार्य केले.

सायबर क्राईमकडून प्रतिसादाची प्रतीक्षा… अशावेळी नामदार उदय सामंत यांचे लाभले मोलाचे सहकार्य

तक्रार नोंदवल्यानंतर सायबर क्राईम विभागाकडून फारसा फॉलो-अप मिळाला नाही. पैसे ब्लॉक झाल्याचा संदेशही मिळाला नाही. त्यामुळे माझ्या वैयक्तिक अनुभवातून मला असे वाटले की तक्रार नोंदवल्यानंतर प्रत्यक्ष मदत मिळण्याबाबत नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होत असतात. अखेर मी याबाबत नामदार उदय सामंत यांच्यापुढे हा प्रश्न घेऊन गेलो. त्यांनी तातडीने याबाबत संबंधित यंत्रणेसमवेत बैठक बोलवली व त्यामध्ये जिल्हा प्रशासनासमवेत सर्व बँकांचे वरिष्ठ अधिकारी जिल्हा पोलीस यंत्रणा सायबर विभाग याचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमुळेच आमच्यासारखा अनेकांचा प्रश्नांना खऱ्या अर्थाने गतीने तपास होण्यासाठी चालना मिळाली. मी त्यांचाही मनापासून आभारी आहे.

आणि एक दिवशी अचानक बँक ऑफ इंडियाकडून धीरजला मेसेज आला “Your cyber insurance is approved — Amount ₹5,38,000.”

त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना! त्याने लगेच तो मेसेज मला पाठवला. मी प्रियांका कुमारी यांच्याकडे चौकशी केली, तेव्हा त्यांनी इन्शुरन्सची रक्कम खात्यात जमा झाल्याचे सांगितले.

मित्राचे कष्टाचे पैसे परत मिळाल्याचा आनंद शब्दांत सांगता येणार नाही. संकटाच्या वेळी मित्राच्या मदतीला धावून जाणे आणि त्याला पुन्हा आनंदाने उभे राहताना पाहणे, यासारखे समाधान दुसरे कोणतेच नाही. माझ्या माहितीनुसार, सायबर इन्शुरन्सची सुविधा प्रत्येक बँकेत सारख्याच स्वरूपात उपलब्ध असेल असे नाही. त्यामुळे बँक ऑफ इंडियाने दिलेल्या या सुविधेचे महत्त्व मला या अनुभवातून प्रकर्षाने जाणवले.

सायबर फसवणुकीपासून संरक्षण आणि नुकसानभरपाईसाठी अशा विमा सुविधांचा अधिकाधिक प्रसार व्हावा. बँकिंग क्षेत्रातील आणि संबंधित नियामक यंत्रणांनी अशा संरक्षणात्मक सुविधांबाबत पुढाकार घ्यावा, ही अपेक्षा आहे.

कारण एक गोष्ट नक्की की कष्टाने कमावलेला पैसा गमावण्याचे दुःख मोठे असते; पण योग्य वेळी योग्य मदत मिळाली, तर पुन्हा उभे राहण्याचे बळही मिळते!

आपल्या आयुष्यात कोण, कुठे आणि कधी मदतीला येईल, हे सांगता येत नाही. संकटात माणुसकी, मैत्री आणि योग्य वेळी मिळालेले सहकार्य किती महत्त्वाचे असते, याचा अनुभव आम्ही घेतला. पण तरीही सर्व यंत्रणा अजूनही अत्याधुनीकं व अधिक सक्षम होणे आवश्यक आहे. बँकानी देखील ग्राहकांना प्राधान्याने सहकार्य करणे आवश्यक आहे जसे आम्हाला बँक ऑफ इंडियाने केले. आमचा लढा संपला आहे; पण यापुढे अशा सायबर फसवणुकीला बळी पडलेल्या कोणालाही मार्गदर्शनाची किंवा मदतीची गरज असेल, तर मला शक्य तेवढी मदत करायला नक्की आवडेल.

शेवटी याकामी तत्परतेने मदत केलेल्या नामदार उदय सामंत यांचे विशेष आभार. तसेच बँक ऑफ इंडियासह बँकेतील अधिकारी धीरज कुमार, प्रियांका कुमारी यांनाही मनःपूर्वक धन्यवाद.

– राजेश सोहोनी (9422382580)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!