मुख्य बातमी

रत्नागिरी पोलिसांचे “मिशन शोध”

एकाच वेळी दोन बेपत्ता व्यक्तींचा लावला शोध

रत्नागिरी : संगमेश्वर येथून २०१८ मध्ये बेपत्ता झालेल्या दोन व्यक्तींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. या दोन्ही व्यक्ती नाव-गाव बदलून नालासोपारा ईस्ट (मुंबई) येथे राहत होत्या. येथून त्यांना २८ सप्टेंबर रोजी रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकामार्फत “मिशन शोध”अंतर्गत ताब्यात घेण्यात आले; मात्र या दोन्ही व्यक्ती आपल्या गावी पुनः येण्यास तयार नसल्याने त्यांना तुळींझ पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले.

पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे यांच्या संकल्पनेतून रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे हद्दीमधून हरवलेले व बेपत्ता झालेल्या इसमांचा शोध घेण्यासाठी “मिशन शोध” सुरू करण्यात आले आहे. “मिशन शोध”च्या अनुषंगाने सर्व पोलीस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेमार्फत जिल्ह्यातील हरविलेल्या व बेपत्ता इसमांचा विशेष शोध घेण्यात येत आहे.

संगमेश्वर पोलीस ठाण्यात नापत्ता रजिस्टरमधील माखजन, बनेवाडी येथील नापत्ता ३३ वर्षीय महिला सन २०१८ पासून बेपत्ता होती. तसेच याच पोलीस ठाण्यातील नापत्ता रजिस्टरमधील नापत्ता योगेश भालचंद्र तांबे (वय ४५, रा. माखजन, बनेवाडी) ही दोन्ही प्रकरणे निष्क्रिय (Dormant) फाइल मंजुरीसाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे प्राप्त झाली होती.

या दोन्ही प्रकरणांची स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकामार्फत “मिशन शोध” अंतर्गत माहिती घेण्यात आली व गोपनीय माहितीच्या आधारे शोध घेण्यात येत होता. २८ सप्टेंबर रोजी या पथकामार्फत दोन्ही नापत्ता इसमांचा मुंबई येथे अधिक शोध घेतला असता दोन्ही व्यक्ति हे आपले नाव-गांव व मोबाइल नंबर बदलून राहत असल्याचे निष्पन्न झाले. या दोन्ही नापत्ता व्यक्तींना नालासोपारा ईस्ट येथून ताब्यात घेण्यात आले व दोन्ही व्यक्ति हे आपल्या गावी पुनः येण्यास तयार नसल्याने त्यांना तुळींझ पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले.

ही, कामगिरी पोलीस अधीक्षक श्री. बगाटे, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे श्रेणी पोलीस उपनिरीक्षकप्रशांत बोरकर आणि पोलीस हवालदार प्रवीण खांबे यांनी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!