शरदचंद्रजी पवार कृषी व संलग्न महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांची पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी दापोली येथे निवड

आबलोली (संदेश कदम) : खरवते-दहिवली (ता. चिपळूण) शरदचंद्रजी पवार कृषी व संलग्न महाविद्यालयातील सुमारे दहा विद्यार्थी व विद्यार्थिनींची डाॅ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी निवड झाली.

नुकत्याच पार पडलेल्या पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश परीक्षेमध्ये या सर्व विद्यार्थ्यानी घवघवीत यश संपादन केले व कृषी विद्यापीठातील विविध कृषी विषय विभागांमध्ये आपला प्रवेश निश्चित करत शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयाची पदव्युत्तर अभ्यासक्रम प्रवेश परीक्षेमध्ये असणारी यशाची दैदीप्यमान परंपरा कायम राखली. यामध्ये प्रणाली नलावडे (कीटक शास्त्र विभाग), पवन यमगर (उद्यानविद्या विभाग), अभिजीत शिंदे (वनस्पती शास्त्र), आकांक्षा पाटील (पशु शास्त्र विभाग), सुरवी सैंदाने (मृदा शास्त्र विभाग), अभिषेक डिसले (कृषी शास्त्र विभाग), पूजा गायकवाड (वनस्पती प्रजनन शास्त्र), दीप्ती राणे (कृषी विस्तार विभाग), अनिरुद्ध रांबाडे (उद्यान विद्या विभाग) व प्रज्ञा शिंदे (वनस्पती रोगशास्र विभाग) यांचा समावेश आहे.
या सर्व विद्यार्थ्यांचे सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील यांनी विशेष कौतुक करत अभिनंदन केले आणि पुढील शैक्षणिक व संशोधनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील यांच्यासह सर्व प्राध्यापकांचे सखोल मार्गदर्शन लाभले.



