महायुतीचा नगराध्यक्ष हा १५ हजाराच्या फरकाने निवडून येणार : पालकमंत्री उदय सामंत
महायुतीकडून पहिल्या टप्प्यात १५ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल

रत्नागिरी : “महायुतीकडून आज पहिल्या टप्प्यात १५ उमेदवारी अर्ज भरलेले आहेत. दुसऱ्या टप्प्यातील महायुतीच्या उमेदवारांची यादी १६ किंवा १७ तारखेला जाहीर करण्यात येणार असून, नगराध्यक्ष पदाचा उमेदवार १७ तारखेला उमेदवारी अर्ज दाखल करेल. या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार निश्चितपणे विजयी होतील आणि महायुतीचा नगराध्यक्ष हा १५ हजाराच्या फरकाने निवडून येईल,” असा विश्वास रत्नागिरीचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज येथे व्यक्त केला.


रत्नागिरी नगर पालिकेच्या निवडणुकीसाठी आज (१५ नोव्हेंबर) महायुतीच्या १५ उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेकडून निमेश नायर, राजन शेट्ये, सौरभ मलुष्टे, गणेश भारती, श्रद्धा हळदणकर, विजय खेडेकर, आफ्रिन होडेकर, सुहेल साखरकर, तर भाजपकडून मानसी करमरकर, वर्षा ढेकणे, राजेश तोडणकर, नितिन जाधव, समिर तिवरेकर, आणि सुप्रिया रसाळ यांचा समावेश आहे.

यावेळी रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार निरंजन डावखरे, आमदार किरण सामंत, माजी आमदार राजन साळवी, अतुल काळसेकर, यशवंत जाधव, भाजपचे ॲड. दीपक पटवर्धन, सचिन वहाळकर, अनिकेत पटवर्धन यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना पालकमंत्री सामंत यांनी महायुतीचे उमेदवार निश्चितपणे विजयी होतील, असा विश्वास व्यक्त केला. महायुतीकडून पहिल्या टप्प्यात १५ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याने शनिवारी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी नगर परिषदेसमोर गर्दी केली होती. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी महायुतीच्या पदाधिकारी आणि उमेदवारांची रॅली काढण्यात आली.



