मुख्य बातमी

गणपतीपुळे समुद्रात तीन तरुण बुडाले

एकाचा मृत्यू; दोघांना वाचवण्यात यश आले

रत्नागिरी : दिवाळी सुट्टीनंतर कोकणात पर्यटकांची मोठी गर्दी होत असताना समुद्रात बुडण्याच्या दुर्घटनांची मालिका वाढू लागली आहे. शनिवारी (१५ नोव्हेंबर) सायंकाळी गणपतीपुळे समुद्रकिनारी अशीच एक दुर्घटना घटना घडली. भिवंडीहून देवदर्शन आणि पर्यटनासाठी आलेल्या सहाजणांपैकी तिघेजण समुद्रात उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने बुडू लागले. यावेळी स्थानिक नागरिक, जेटस्की ऑपरेटर आणि वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिकांनी धाव घेऊन दोघांना सुखरूप वाचवले. मात्र, अमोल गोविंद ठाकरे (२५, रा. भिवंडी) या तरुणाचा मृत्यू झाला.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास तीन तरुण समुद्रात उतरले. लाटा अचानक मोठ्या होऊ लागल्याने तिघेही बुडू लागले. त्यांचा आरडाओरड ऐकून वॉटर स्पोर्ट्सचे जेटस्की चालक आणि किनाऱ्यावरील जीवरक्षकांनी तात्काळ मदत केली.

मंदार दीपक पाटील (२४) आणि विकास विजय पालशर्मा (२४, दोघेही भिवंडी) यांना जेटस्कीद्वारे खेचून सुरक्षित बाहेर काढण्यात आले; मात्र अमोल ठाकरे याला बाहेर काढल्यानंतरही त्याला वाचवता आले नाही. मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणीदरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

या तरुणांनी दिवसभर गणपतीचे दर्शन घेऊन परिसरात फोटोसेशन करत पर्यटनाचा आनंद घेतला होता. पण काही क्षणांतच साऱ्या आनंदावर विरजण पडले. अमोल ठाकरे हा खासगी नोकरी करत होता. त्याच्या अचानक मृत्यूने ठाकरे कुटुंबीयांवर तसेच मित्रपरिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अमोलच्या पश्चात आई-वडील आणि बहिण असा परिवार आहे.

घटनेची माहिती मिळताच जयगड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील पथकासह घटनास्थळी दाखल झाले. वॉटर स्पोर्ट्स व्यावसायिक, स्थानिक नागरिक आणि जीवरक्षकांच्या प्रसंगावधानामुळे किमान दोन जीव वाचवणे शक्य झाल्याचे पोलिसांनी सांगितले.

समुद्रकिनाऱ्यावर सातत्याने पोलीस, मंदिर प्रशासन आणि जीवरक्षकांकडून खोल पाण्यात न जाण्याच्या सूचना दिल्या जातात. मात्र या सूचनांकडे अनेक पर्यटक दुर्लक्ष करतात. त्यामुळे अशा दुर्दैवी घटना वारंवार घडत असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.

पर्यटकांनी गणपतीपुळे समुद्रात स्नान करताना अत्यंत काळजी घ्यावी, खोल पाण्यात जाऊ नये आणि दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!