विद्यार्थी हा परीक्षार्थी न राहता ज्ञानार्थी झाला पाहिजे : प्रा. कृष्णाजी कुलकर्णी

रत्नागिरी : “शिक्षण हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाचा मूलमंत्र आहे. त्यामुळे विद्यार्थी हा परीक्षार्थी न राहता ज्ञानार्थी झाला पाहिजे. विद्यार्थ्यांनी गुण मिळवण्याच्या मागे न लागता ज्ञान प्राप्तीसाठी शिक्षण घेतले पाहिजे. त्याचसोबत ज्ञानेश्वरी, पसायदान यांचा भावनिक अर्थ आणि संक्षेपित अर्थ समजून घेण्याची आवश्यकता आहे,” असे प्रतिपादन प्रा. कृष्णाजी कुलकर्णी यांनी केले.
रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय संघ रत्नागिरी व माध्यमिक विद्यामंदिर अँड ज्युनिअर कॉलेज नाणीज यांच्या संयुक्त विद्यमाने “आम्ही आणि शिक्षण” या विषयावर गोवा येथील नामवंत साहित्यिक व निवृत्त प्रा. कृष्णाजी कुलकर्णी यांचे व्याख्यान झाले.
यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी जीवनात आपण यशस्वी होऊ शकतो, मात्र त्यासाठी अनेक थोरामोठ्यांनी काय केले आहे याचे सूक्ष्म निरीक्षण करून ते आत्मसात केले पाहिजे, असे सांगितले.
यावेळी प्रशालेच्या प्राचार्य रूपाली सावंतदेसाई, मराठी भाषा विषय समितीचे अध्यक्ष सुधाकर माने, ग्रंथपाल आशिष सरफरे, ज्येष्ठ लिपिक घनश्याम कदम आणि सर्व विद्यार्थी, शिक्षक उपस्थित होते.


