राज्यातील २९ महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला; १५ जानेवारीला मतदान
आजपासून आचारसंहिता लागू; २,८६९ जागांसाठी ‘१ जुलै २०२५’ ची मतदार यादी वापरणार

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाने आज (१५ डिसेंबर) राज्यातील २९ महानगरपालिका निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या घोषणेमुळे संपूर्ण राज्यात आजपासून तातडीने आचारसंहिता लागू झाली आहे. राज्यातील एकूण २,८६९ जागांसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे.
राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मात्र, ही आचारसंहिता कोणत्याही आपत्कालीन (डिझास्टर) कामांसाठी आडकाठी ठरणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २९ महापालिकांमधील एकूण २,८६९ जागांवर ही निवडणूक लढवली जाईल.
नामांकन अर्ज स्वीकारण्याचा कालावधी- २३ डिसेंबर ते ३० डिसेंबर २०२५
नामांकनांची छानणी- ३१ डिसेंबर २०२५
उमेदवारी माघारीची अंतिम मुदत- २ जानेवारी २०२६
निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम यादी- ३ जानेवारी २०२६
मतदानाचा दिनांक- १५ जानेवारी २०२६
मतमोजणीचा दिनांक- १६ जानेवारी २०२६


