चांदोर उगवतीवाडी व चिंचवाडी येथील महिला बचत गटातील महिलांनी श्रमदानातून बांधले नदीवर बंधारे

रत्नागिरी : तालुक्यातील चांदोर ग्रामपंचायत हद्दीत ग्रामपंचायतीचे उपसरपंच सूर्यकांत तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानअंतर्गत लोकसहभागातून श्रमदानाद्वारे चांदोर उगवतीवाडी व चिंचवाडी येथील महिला बचत गटातील महिलांनी सीआरपी सौ. नेहा तांबे यांच्या नियोजनातून वनराई बंधारे बांधण्यात आले.
बंधारा बांधण्यासाठी दगड, माती, रिकाम्या सिमेंटच्या पिशव्या यांचा वापर करून अतिशय कमी खर्च करून हा बंधारा बांधण्यात आला. वनराई बंधाऱ्या परिसरात भुजल पातळी वाढण्यास मदत होईल. शिवाय विहिरीच्या पाण्याची पातळी वाढण्यास मदत होईल. यामुळे पाणी पुरवठा सुरळीत राहण्यासाठी मदत होईल. तसेच आजूबाजूच्या जमिनीत ओलावा टिकून राहील. या बंधाऱ्यांमुळे पाणी टंचाईला आळा बसेल व महिलांचा, जनावरांचा पाण्याचा प्रश्न ही सुटेल.
हे बंधारे बांधण्यासाठी बचत गटातील महिलांना ग्रामस्थांचे ही सहकार्य मिळाले.



