राष्ट्रीय खो-खो चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राच्या पुरूष, महिला संघांचा साखळी सामन्यात दणदणीत विजय

काझीपेठ, तेलंगणा : येथील रेल्वे ग्राऊंडवर सुरू असलेल्या ५८ व्या वरिष्ठ राष्ट्रीय खो-खो चॅम्पियनशिपमध्ये महाराष्ट्राच्या पुरूष व महिला संघांनी साखळी सामन्यात गटात पहिला सामन्यात विरोधकांवर दणदणीत विजय मिळवला. दोन्ही संघांनी प्रतिमेला साजेसा खेळ केला. तसेच महिलांमध्ये पश्चिम बंगाल, हरयाणा, पंजाब यांनी तर पुरूष गटात दिल्ली, छत्तीसगड, विदर्भ, पॉंडिचेरी, उत्तरप्रदेश, गुजरात या संघानीही साखळी सामन्यांमध्ये विजयी वाटचाल सुरू ठेवली.
भारतीय खो-खो महासंघाच्या मान्यतेने तेलंगणा खो-खो असोसिएशन आयोजित महिला आणि पुरुष राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत साखळी सामन्यात महाराष्ट्रच्या पुरुष गटात मणिपूरवर १ डाव १५ गुणांनी (३१-१६) सहज मात करत पहिला विजय नोंदवला. परंपरेला साजेसा आक्रमक खेळ करत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी मैदान गाजवले. मध्यंतराला महाराष्ट्र संघाकडे २३ गुणांची (३१-८) आघाडी होती. त्यात ड्रीमरनच्या ५ गुणांचा समावेश होता. या सामन्यात महाराष्ट्रकडून शुभम थोरात (२.१० मि. संरक्षण व ४ गुण), सुयश गरगडे (१.३०, २ मि. संरक्षण), रूद्र थोपटे (१० गुण) यांनी चांगला खेळ करतानाच विजयात मोलाची कामगिरी केली. तर मणिपूरकडून एस. रूकसन (१ मि. संरक्षण), के. एच. सचिन (६ गुण) यांनी चांगला खेळ केला.
दुसऱ्या सामन्यात विदर्भने उत्तराखंडचा १ डाव ९ गुणांनी (२५-१६) मात केली. विजयी संघाकडून राहूल सहारा (३.३०, १.३० मि. संरक्षण), फैयाज पठाण (१.४० मि. संरक्षण व १० गुण), यश सदाशिव (२.१० मि. संरक्षण) यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. तर उत्तराखंडकडून कोलीशा (१. मि. संरक्षण व ४ गुण), योगेश कुमार (४ गुण) यांनी चांगला खेळ केला.
उर्वरीत सामन्यांचे निकाल असे : दिल्लीने सिक्कीमचा १ डाव ८३ गुणांनी (८७-४) सहज पराभव केला. छत्तीसगडने सेंट्र आर्म पोलिस फोर्सचा एक डाव २६ गुणांनी (३८-१२), पॉंडेचरीने चंदीगडचा एक डाव २५ गुणांनी (३७-१२) पराभूत केले. उत्तरप्रदेशने जम्मु काश्मिरचा (३४-२०) १४ गुण आणि ५ मि. १० सेकंद राखून पराभव केला. गुजरातने त्रिपुरावर १ डाव ३० गुणांनी (४०-१०) मात केली.
महिला गटातील सामन्यांमध्ये महाराष्ट्रने छत्तीसगडला १ डाव २३ गुणांनी (३५-१२) पराभूत करीत गटात पहिला विजय नोंदवला. या सामन्यात महाराष्ट्रच्या खेळाडूंनी उत्तम संरक्षण केले. छत्तीसगडला मैदानावर एकही खेळाडू बाद करता आला नाही. मध्यंतराला महाराष्ट्रने (२८-६) २२ गुणांची आघाडी घेतली होती. दोन्ही डावात मिळून ड्रीमरनचे ७ गुण मिळवले. या विजयात महाराष्ट्रच्या रेश्मा राठोड (२.१० मि. संरक्षण व ४ गुण), सरीता दिवे (२.१० मि. संरक्षण), अश्विनी शिंदे (१.५० मि. संरक्षण व ६ गुण), प्रियांका इंगळे (१.४० मि. संरक्षण व ६ गुण), मैथिली पवार (१.५० मि. संरक्षण) यांनी मोलाची कामगिरी केली. छत्तीसगडकडून एकमेव पायल पटेल (१ मि. संरक्षण) या खेळाडूने चमक दाखवली.
दुसऱ्या सामन्यात पश्चिम बंगालने मणिपूरचा १ डाव २९ गुणांनी (३१५-६) सहज पराभव केला. विजयी संघाकडून प्रतिमा (३.५० मि. संरक्षण व ८ गुण), सुजाता दास (३.१० मि. संरक्षण व २ गुण), इशिता विश्वास (३.१० मि. संरक्षण व २ गुण) यांनी चांगला खेळ केला. तर मणिपूरकडून इली देवी (१.२० मि. संरक्षण व २ गुण) हिने चमक दाखवली.
उर्वरीत सामन्यात हरयाणा संघाने बिहारचा (४०-६) १ डाव ३६ गुणांनी पराभव केला. पंजाबने गोव्यावर एक डाव ३३ गुणांनी मात केली.
उद्घाटन सोहळ्यात मान्यवरांची उपस्थिती
५८ व्या वरिष्ठ राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेचा उद्घाटन समारंभ अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. या प्रसंगी तेलंगणाचे सिंचन मंत्री उत्तम कुमार रेड्डी, क्रीडा मंत्री वकिटी श्रीहरी, खो-खो फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष सुधांशु मित्तल, सरचिटणीस उपकार सिंग, खजिनदार गोविंद शर्मा तसेच तेलंगणा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष व स्पर्धेचे मुख्य आयोजक जंग राघव रेड्डी यांची प्रमुख उपस्थिती होती.


