कोकण कृषी विद्यापीठात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे कार्यक्रम

दापोली : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाने (मुंबई) ठरवून दिलेल्या समान किमान कार्यक्रमा अंतर्गत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने “महिलांचे कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून संरक्षण” या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
हा कार्यक्रम २७ जानेवारी रोजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनोद यशवंतराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली झाला. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. आर. पाटील, कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. संतोष विष्णू सावर्डेकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी सचिव श्री. पाटील यांनी ‘कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण कायदा’ याबाबत सविस्तर माहिती दिली. लैंगिक छळ म्हणजे काय, कोणती कृत्ये लैंगिक छळाच्या व्याख्येत येतात, याविषयी त्यांनी उदाहरणांसह मार्गदर्शन केले. तसेच कामाच्या ठिकाणी लैगिक छळ होत असल्यास महिलांनी कोणती पावले उचलावीत, तक्रार कशी करावी, याबाबतही माहिती दिली.
याशिवाय लैगिक छळ तक्रार निवारण समितीची रचना, तिची कार्यपद्धती व जबाबदाऱ्या याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. मार्गदर्शनानंतर उपस्थित विद्यार्थिनी व कर्मचाऱ्यांनी आपल्या शंका उपस्थित केल्या. सचिव श्री. पाटील यांनी शंकाचे निरसन केले.
कार्यक्रमासाठी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी व महिला कर्मचारी तसेच महिला व पुरुष शिक्षकवृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.



