पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा २७ फेब्रुवारी रोजी

रत्नागिरी : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिने पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन शुक्रवारी (२७ फेब्रुवारी) रोजी सकाळी १० ते दुपारी २ वाजता फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नोलॉजी, मिरजोळे एमआयडीसी रत्नागिरी येथे करण्यात आलेले आहे.
जिल्ह्यातील खासगी आस्थापनांनी महास्वयंम वेबपोर्टलच्या माध्यमातून रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन बेरोजगार उमेदवारांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा. जिल्ह्यातील सर्व खासगी आस्थापनांना/उद्योजकांनी आपणांकडे उपलब्ध असलेली रिक्त पदे www.mahaswayam.gov.in या पोर्टलवर अधिसूचित करण्यात यावी व जिल्हयातील उमेदवारांना रोजगार संधी उपलब्ध करून द्यावीत. जिल्ह्यातील सर्व खासगी आस्थापनांनी/ उद्योजकांनी आपणांस देण्यात आलेला युझर आयडी व पासवर्ड चा वापर करुन रिक्तपदे ऑनलाईन अधिसूचित करावी व प्रत्यक्ष रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून उमेदवारांची निवड करून रोजगार उपलब्ध करुन देण्यात यावा. रोजगार मेळाव्यामध्ये सहभागी होणेसाठी नोंदणी नसल्यास जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयाकडे त्वरित संपर्क साधून नोंदणी करावी व रोजगार मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्र. सहायक आयुक्त मोरेश्वर दुधाळ यांनी केले आहे.



