मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

नागावेतील भंगार गोडावूनला भीषण आग

इमारत भस्मसात, सहा कामगार बचावले

चिपळूण : तालुक्यातील नागावे नदीपात्रालगत असलेल्या भंगार प्लास्टिक साठ्याच्या गोडावूनला अचानक लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण इमारत जळून खाक झाली. या घटनेत सहा कामगारांनी प्रसंगावधान राखत वेळीच बाहेर पडून आपला जीव वाचवला. ही घटना सायंकाळी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पालांडे नामक व्यवसायिकाची नागावे येथे डबर-खडी क्रशर होती. ती बंद पडल्यानंतर संबंधित जागा भंगार व्यवसायिकाला भाडेतत्त्वावर देण्यात आली होती. या ठिकाणी भंगार प्लास्टिक पिशव्या धुणे व सुकवून त्यापासून कच्चा माल तयार करण्याचे काम सुरू होते. गोडावूनमध्ये सुमारे तीन ट्रक इतका प्लास्टिक साठा होता.

दरम्यान, इमारतीलगत वाढलेले गवत शेतीकामासाठी पेटवण्यात आले होते. कडक उन्हामुळे ही आग वेगाने पसरत जाऊन प्लास्टिक साठ्यापर्यंत पोहोचल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे वणव्यामुळे ही आग लागल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आग लागल्यानंतर जवळपास अर्धा तास पोलीस व अग्निशमन दलाला कळवण्यात विलंब झाल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली.

त्यानंतर महाजनको, पोफळी येथून अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. मात्र पाणीसाठा अपुरा पडल्याने आग विझवण्यात अडचणी निर्माण झाल्या. त्यानंतर चिपळूण नगरपालिकेचा अग्निशमन बंबही घटनास्थळी पोहोचला असून आग विझविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

आगीची तीव्रता इतकी मोठी होती की काही वेळातच संपूर्ण गोडावून भस्मसात झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, घटनेची पुढील चौकशी सुरू असून आगीचे नेमके कारण शोधण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!