मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

राजापुरात अवकाळी पावसाची एंट्री

राजापूर : शहरासह तालुक्यात शुक्रवारी सायंकाळी मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास अचानक काळ्याकुट्ट ढगांनी आकाश व्यापले आणि जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. या अचानक आलेल्या पावसामुळे नागरिक, व्यापारी तसेच शेतकरी वर्गाची मोठी तारांबळ उडाली.

दुपारपासूनच वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल जाणवत होता. उष्णतेची तीव्रता वाढली होती. सायंकाळी पाचनंतर ढगाळ वातावरण निर्माण झाले आणि त्यानंतर काही वेळातच वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली. राजापूर शहर परिसरासह तालुक्यातील विविध भागांत पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.

या अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका आंबा बागायतदारांना बसला आहे. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी आंब्यांची मोठ्या प्रमाणात गळती झाली असून बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले आहे. आधीच हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात असताना झालेल्या या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.

दरम्यान, हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ जारी केला असून ३० ते ४० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहण्याची तसेच विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून विजांच्या कडकडाटावेळी घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे.

राजापूर बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची तसेच व्यापाऱ्यांचीही या अचानक आलेल्या पावसामुळे मोठी धावपळ उडाली. काही ठिकाणी वाऱ्यामुळे फलक व तात्पुरत्या शेड्स हलल्याचेही दिसून आले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!