रत्नागिरीत अवकाळी पावसाचा धुडगूस
घरांचे नुकसान, वीज पुरवठा खंडित : गावखडीत दोन मुले जखमी

रत्नागिरी : वादळी वार्यासह आलेल्या अवकाळी पावसाने रत्नागिरी तालुक्याला चांगलेच झोपडून काढले. विशेषत: उत्तर रत्नागिरी तालुक्यातील करबुडे, लाजुळ, जाकादेवी, खालगाव, उक्षी या गावांमध्ये मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी झाडे कोसळली असून घरांची छपरे उडाली आहेत, महावितरणचेही मोठे नुकसान झाले असून वीज पुरवठाही खंडीत झाला आहे. गावखडी येथे घरावर माड कोसळून दोन मुले जखमी झाली आहेत.
शनिवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी तालुक्यामध्ये वादळी वार्यासह पाऊस कोसळला. सुरुवातीला धुळीचे वादळ निर्माण झाले, सुमारे वीस ते पंचवीस मिनिटे हे वादळ घोंगावत होते. त्यानंतर पावसाने वार्यासह झोडपून काढले.
तालुक्यातील उत्तर भागात विशेषत: करबुडे, लाजुळ, जाकादेवी, खालगाव, उक्षी, नरबे, परचुरी या भागाला मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. अनेक ठिकाणी झाडे कोसळली आहेत. रस्त्यावर झाडे कोसळल्याने रस्ते बंद झाले. जाकादेवी शाळा क्र. तीनचे नुकसान झाले आहे. जाकादेवी येथील रघुनाथ गोताड यांच्या भात गिरणीचे छप्पर वार्यामुळे उडून मोठे नुकसान झाले आहे. खालगाव नं. २ जि.प. शाळेचेही नुकसान झाले आहे.
या घटनेची माहिती मिळताच पंचायत समिती सभापती प्रवीण पांचाळ, जि.प. सदस्य व शिवसेना तालुकाप्रमुख बाबू म्हाप, पंचायत समिती सदस्या नेहा गावणकर, शिवसेना विभाग संघटक मिलींद खानविलकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांना देण्यात आली आहे. पालकमंत्री सामंत यांनी तातडीने ग्रामस्थांना मदतीचा हात देण्याच्या सूचना पंचायत समिती सभापती पांचाळ आणि तालुकाप्रमुख बाबू म्हाप यांना दिल्या आहेत.
शहरानजीकच्या कुवारबाव परिसरालाही फटका बसला. मोठ्याप्रमाणात माती खाली आल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले. गावखडी येथे घरावर माड कोसळल्याने दोन मुले जखमी झाली आहेत. शहरामध्ये शनिवारी आठवडा बाजार होता. त्यामुळे विक्रेते आणि खरेदीदारांचीही या वादळाने त्रेधातिरीपीट उडाली. या वादळीवार्याचा व पावसाने संपूर्ण तालुक्याला फटका बसला.
आधीच आंबा कमी असताना, वादळी वारा व पावसामुळे आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या शेवटच्या टप्प्यातील आंब्याची काढणी सुरू होती. आंबा व्यावसायिकांना याचा मोठो फटका बसला.



