मुख्य बातमी

गणेशगुळे किनाऱ्यावर फिनलेस पोर्पोइज मृतावस्थेत

रत्नागिरी : तालुक्यातील गणेशगुळे समुद्रकिनाऱ्यावर इंडो-पॅसिफिक फिनलेस पॉरपॉईज हा सस्तन प्राणी मृतावस्थेत आढळला. थोडासा डॉल्फिनसारखा दिसणारा हा मासा मृत झाल्याने किनारी भागात दुर्गंध येत होतो. तो कशामुळे मृत पावला याचे निदान होऊ शकले नाही. भरतीच्या वेळेस तो पुन्हा समुद्रात वाहून गेला.

इंडो-पॅसिफिक फिनलेस पॉरपॉईज याचे शास्त्रीय नाव नेओफोकेना फोकेनोइड्स आहे. अनेकदा याला डॉल्फिन किंवा डुकरा मासा म्हणून ओळखले जाते. पॉरपॉईज या प्राण्याला कोणतीही लांब चोच नाही, त्याचे डोके गोल आहे आणि पाठीवर कोणताही कल्ला दिसत नाही. यामुळेच याला ‘फिनलेस पॉरपॉईज’ म्हणतात. हा प्रामुख्याने हिंदी महासागर आणि पश्चिम पॅसिफिक महासागर परिसरात आढळतो. लांबी साधारण 1.5 ते 2 मीटर असते. मासे आणि लहान समुद्री जीव हे याचे मुख्य अन्न आहे. प्रदूषण, मासेमारीच्या जाळ्यात अडकणे आणि अधिवास नष्ट होणे यामुळे हा प्राणी धोक्यात असल्याचे मानले जाते.

हा प्राणी दुर्दैवाने मृत अवस्थेत गणेशगुळे किनाऱ्यावर वाहून आला. हा अत्यंत संरक्षित श्रेणीमध्ये येतो. हा मृत प्राणी कुजण्यास सुरवात झाल्याने त्या भागात दुर्गंध येत होता. संध्याकाळच्या वेळेस हा मासा भरतीच्या एका जोरदार लाटेमुळे पुन्हा समुद्रात वाहून गेला.

पश्चिम किनारपट्टीपासून पर्शियन गल्फकडे आढळतात. पण डॉल्फिन्ससारखे फारसे किनाऱ्याजवळ येत नाहीत. ते असुरक्षित गटात मोडतात. त्यामुळे त्यांचे संरक्षण महत्त्वाचे ठरते. अंदाजानुसार हाँगकाँग आणि लगतच्या पाण्यात सुमारे २०० तर बांगलादेशच्या किनारी पाण्यात सुमारे १,३०० इंडो पॅसिफिक फिनलेस पॉरपॉईज असावेत.

याबाबत माहिती देताना समुद्री जीव अभ्यासक डॉ. स्वप्नजा मोहिते म्हणाल्या, “इंडो-पॅसिफिक फिनलेस पॉरपॉईज (Neophocaena phocaenoides) हा किनारी परिसंस्थेच्या आरोग्याचा एक महत्त्वाचा सूचक आहे, कारण त्यांची उपस्थिती उथळ सागरी अधिवास आणि खाड्यांची स्थिरता दर्शवते. एक असुरक्षित प्रजाती म्हणून, प्रदूषण, अन्नसाखळीचे आरोग्य आणि मानवी हस्तक्षेपांचे परिणाम यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी ते महत्त्वपूर्ण आहेत. हे प्राणी लाजाळू असल्यामुळे आणि उथळ किनारी प्रदेश, उपसागर व खारफुटीच्या जंगलांमध्ये राहत असल्यामुळे, त्यांना पर्यावरणातील बदल अत्यंत संवेदनशीलपणे जाणवतात. त्यांच्या लोकसंख्येचे आरोग्य हे त्यांच्या अधिवासाच्या एकूण स्थितीचे प्रतिबिंब असते. म्हणूनच त्यांचे संरक्षण महत्त्वाचे ठरते.”

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!