धामणंद येथील नागझरी नदीत तिघांचा बुडून मृत्यू

खेड : तालुक्यातील धामणंद काजूफाटा परिसरातील नागझरी नदीतील डोहात पोहण्यासाठी गेलेल्या तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी घडली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून खेड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १८ मे रोजी दुपारी साडेतीन ते सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मृतांमध्ये लावण्या विजय पार्टे (वय १५, रा. साखर चौकीचीवाडी, ता. खेड), नितीन सुर्यकांत जाधव (वय ३८, रा. गिमवी, ता. गुहागर, सध्या रा. मनीषा नगर कळवा ठाणे ) आणि विराज किशोर जाधव (वय १२, रा. गिमवी, ता. गुहागर, सध्या रा. मनीषा नगर, कळवा ठाणे ) यांचा समावेश आहे.
याबाबतची माहिती आजोबा अरुण गोपाळ पार्टे यांनी पोलिसांना दिली. लावण्या पार्टे हिच्यासोबत नितीन जाधव आणि विराज जाधव हे नागझरी नदीतील डोहात पोहण्यासाठी गेले होते. मात्र डोहातील पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अचूक अंदाज न आल्याने तिघेही पाण्यात बुडाले.
घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. मोठ्या प्रयत्नांनंतर तिघांनाही बाहेर काढण्यात आले, मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. या दुर्दैवी घटनेमुळे धामणंद आणि परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून खेड पोलिस अधिक तपास करत आहेत.



