मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

आडिवरे-वैत्ये मार्गावर वयोवृद्धाची सोनसाखळी हिसकावली

जबरी चोरी करून दुचाकीस्वाराचा पोबारा; पोलीस अधीक्षकांची घटनास्थळी भेट

राजापूर : नाटे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आडिवरे ते वैत्ये जाणाऱ्या रस्त्यालगतच्या परिसरात एका अज्ञात दुचाकीस्वाराने वयोवृद्ध इसमाची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून पळ काढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वयोवृद्ध इसम रस्त्यालगत असताना अज्ञात दुचाकीस्वाराने त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी जबरीने खेचून घटनास्थळावरून वेगाने पलायन केले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्येही घबराट पसरली.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडून घटनेची सविस्तर माहिती घेत तपासाबाबत आवश्यक त्या सूचना दिल्या. तसेच हा गुन्हा लवकरात लवकर उघडकीस आणून आरोपीला अटक करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

सध्या या प्रकरणाचा तपास नाटे पोलीस ठाण्याकडून वेगाने सुरू असून आरोपीचा माग काढण्यासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा तसेच पोलिसांची विशेष पथके सक्रिय करण्यात आली आहेत. ठिकठिकाणी नाकाबंदी करून संशयितांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

या घटनेनंतर नागरिकांनी सतर्क राहावे तसेच संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहनही पोलिस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!