युवासेना रत्नागिरी जिल्हा आयोजित ‘सडेतोड वक्तृत्व स्पर्धा २०२६’ उत्साहात
गौरवी ओळकर ठरली प्रथम क्रमांकाची मानकरी

रत्नागिरी : युवासेना रत्नागिरी जिल्ह्याच्या वतीने आयोजित बहुप्रतीक्षित आणि प्रतिष्ठेची ‘सडेतोड वक्तृत्व स्पर्धा २०२६’ आज (७ जून) अत्यंत उत्साही आणि अटीतटीच्या वातावरणात संपन्न झाली. या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा, राजापूर, रत्नागिरी, चिपळूण आणि संगमेश्वर या विविध तालुक्यांमधून आलेल्या तरुण वक्त्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. ‘Vision Maharashtra 2050’ आणि ‘राजकारण आणि समाजकारण : युवकांची भूमिका’ या विषयांवर स्पर्धकांनी आपले परखड आणि अभ्यासपूर्ण विचार मांडून उपस्थितांची मने जिंकली.
या स्पर्धेत आपल्या वक्तृत्वाची छाप पाडत गौरवी मंदार ओळकर ही प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. तिला १० हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच यश नितीन शेलार (७ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र) आणि अथर्व विवेक पाध्ये (५ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र) यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावला. गुणवंत विजेत्यांशिवाय स्पर्धेत सहभागी झालेल्या इतर सर्वच स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी त्यांना सन्मानपूर्वक सहभाग प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.
तरुण वक्त्यांच्या वक्तृत्व कौशल्याचे, मांडणीचे आणि विषयाचे योग्य मूल्यमापन करण्यासाठी परीक्षक म्हणून गणपत शिर्के, रमाकांत सावंत आणि अमृत गोरे यांनी अत्यंत चोख आणि महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यांनी विजेत्यांचे कौतुक करत उपस्थित सर्व तरुणांना भविष्यातील वक्तृत्वासाठी मोलाचे मार्गदर्शन केले.
“स्वर तुमचा, विचार तुमचा, दिशा महाराष्ट्राची!” हे ब्रीदवाक्य डोळ्यांसमोर ठेवून आयोजित केलेल्या या स्पर्धेने रत्नागिरीतील तरुणांना हक्काचे विचारमंच मिळवून दिले असून, सर्व स्तरांतून या यशस्वी उपक्रमाचे भरभरून कौतुक होत आहे.
माजी खासदार विनायक राऊत यांच्या संपर्क कार्यालयात पार पडलेल्या या सोहळ्याला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष, युवासेना आणि महिला आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून स्पर्धकांचा उत्साह वाढवला. याप्रसंगी युवती सेना जिल्हा विस्तारक श्रुतिका कदम, शिवसेना जिल्हा समन्वयक रवींद्र डोळस, रत्नागिरी तालुका प्रमुख मयुरेश्वर पाटील, रत्नागिरी जिल्हा युवा अधिकारी प्रसाद सावंत, उपजिल्हा अधिकारी संतोष हातनकर, युवती उपजिल्हा अधिकारी निशा भोबसकर, लांजा तालुका युवाधिकारी अभिजीत राजेशिर्के, रत्नागिरी तालुका युवाधिकारी संदेश नारगुडे, चिपळूण तालुका युवाधिकारी प्रीतम वंजारे, रत्नागिरी शहर युवाधिकारी आशिष चव्हाण, शिवसेना महिला उपजिल्हा संघटक सौ. सायली पवार व रत्नागिरी विधानसभा क्षेत्र संघटक सौ. अनिशा नागवेकर, उपतालुका प्रमुख विजय देसाई, विभाग प्रमुख किरण तोडणकर, शिवसेना रत्नागिरी उपशहर प्रमुख सलील डाफळे, विभाग प्रमुख संदेश भिसे, निखिल बने, ओंकार कारेकर, नगरसेवक केतन शेट्ये, अमित विलणकर, अजिंक्य सुर्वे, तीर्था लाड, दिव्या सुर्वे, संतोष लिंगायत, आदित्य कामत उपस्थित होते. यासोबतच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, युवा/युवती सेना व महिला आघाडीचे इतर सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



