मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

अर्जुना नदीतील गाळ उपसा कामाला वेग

राजापूर : तालुक्यातून वाहणाऱ्या अर्जुना नदीतील पाचल पेठवाडी येथील जांगलदेव परिसरातील गणेश विसर्जन घाटाजवळ साचलेला गाळ काढण्याच्या कामाला सध्या वेग आला आहे. राजापूर-लांजा-साखरपा मतदारसंघाचे आमदार किरण ऊर्फ भैया सामंत यांच्या माध्यमातून हे काम हाती घेण्यात आले असून गेल्या तीन दिवसांपासून नदीपात्रातील गाळ उपशाचे काम सुरू आहे.

अर्जुना नदीच्या या परिसरात मोठ्या प्रमाणावर गाळ साचल्याने नदीपात्र उथळ होत चालले होते. विशेषतः गणेश विसर्जन घाट परिसरात विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. तसेच पावसाळ्याच्या काळात नदीतील पाण्याचा प्रवाह मंदावून पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. ही बाब लक्षात घेऊन स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार गाळ उपसा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

सध्या सुरू असलेल्या या कामामुळे नदीपात्र अधिक स्वच्छ व मोकळे होण्यास मदत होणार आहे. यामुळे पाण्याचा प्रवाह सुरळीत राहण्यास मदत होऊन भविष्यात पूरस्थितीचा धोका कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. संबंधित यंत्रणेकडून मिळालेल्या माहितीनुसार, आणखी काही दिवस हे काम सुरू राहणार आहे.

दरम्यान, या कामाची पाहणी तळवडे-पाचल विभागप्रमुख अमर जाधव, पाचल विभाग मुंबई संपर्क प्रमुख विहंग खानविलकर तसेच हर्षद तेलंग यांनी केली. यावेळी त्यांनी कामाच्या प्रगतीची माहिती घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
स्थानिक नागरिकांनीही नदीपात्रातील गाळ उपशाच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले असून या उपक्रमासाठी आमदार किरण ऊर्फ भैया सामंत यांचे आभार मानले आहेत.

नदीपात्र स्वच्छ व मोकळे झाल्याने गणेश विसर्जनासाठी येणाऱ्या भाविकांना सुविधा मिळण्याबरोबरच पर्यावरणीयदृष्ट्याही या कामाचा सकारात्मक परिणाम होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!