मुख्य बातमी

कोकणात मान्सून दाखल; तरीही पाऊस गायब

जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ७८ टक्क्यांहून अधिक पावसाची तूट

रत्नागिरी : कोकणात नैऋत्य मान्सूनचे आगमन होऊनही अपेक्षित दमदार पावसाने अद्याप हजेरी लावलेली नाही. भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस कोकण-गोव्यात तुरळक ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला असून काही ठिकाणी मेघगर्जनेसह ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातील १५ जूनपर्यंतच्या पर्जन्यमानाच्या आकडेवारीने चिंताजनक चित्र समोर आणले आहे. यंदा जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल ७८ टक्क्यांहून अधिक पावसाची तूट नोंदवली गेली आहे.

हवामान विभागाच्या १४ जूनच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, महाराष्ट्रात मान्सूनच्या पुढील प्रगतीसाठी वातावरण अनुकूल असून येत्या चार ते पाच दिवसांत राज्यातील आणखी काही भागांमध्ये मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. १४ ते २० जूनदरम्यान कोकण-गोव्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस अपेक्षित असून १४ आणि १६ जून रोजी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्यांचा इशारा देण्यात आला आहे. तसेच १४ ते १७ जूनदरम्यान उष्ण व दमट हवामान कायम राहण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या अहवालानुसार, १५ जून रोजी जिल्ह्यात केवळ १.२१ मिमी पावसाची नोंद झाली. १ ते १५ जून या कालावधीत जिल्ह्यात एकूण ५९८.९४ मिमी पाऊस झाला असून तो वार्षिक सरासरीच्या अवघ्या १.९८ टक्के इतकाच आहे. तालुकानिहाय आकडेवारीत रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक १५९.८५ मिमी, तर गुहागरमध्ये १४२.२० मिमी पावसाची नोंद झाली. दुसरीकडे मंडणगडमध्ये केवळ ८.७५ मिमी, खेडमध्ये २१.३१ मिमी आणि दापोलीत २८.२४ मिमी पाऊस झाला आहे.

महाराष्ट्र शासनाच्या महाबोध पर्जन्यमान नोंदीनुसार, १ ते १५ जूनदरम्यान जिल्ह्यात ७२४.२० मिमी पाऊस झाला असून तो वार्षिक सरासरीच्या केवळ २.३९ टक्के इतका आहे. रत्नागिरी तालुक्यात १५५.४० मिमी, राजापूरमध्ये १४५.६० मिमी आणि गुहागरमध्ये १०८.१० मिमी पावसाची नोंद झाली. मंडणगडमध्ये १७.४० मिमी तर खेडमध्ये फक्त १२.१० मिमी पाऊस झाला.

१५ जून २०२५ पर्यंत जिल्ह्यात २७१३.९५ मिमी पावसाची नोंद झाली होती. मात्र यंदा त्याच कालावधीत केवळ ५९८.९४ मिमी पाऊस झाला आहे. म्हणजेच पावसात सुमारे ७८ टक्क्यांपेक्षा अधिक घट झाली आहे. गेल्या वर्षी या कालावधीत वार्षिक सरासरीच्या ८.९६ टक्के पाऊस झाला होता, तर यंदा हा आकडा अवघ्या १.९८ टक्क्यांवर आला आहे.

तालुकानिहाय तुलनेत दापोली, लांजा, गुहागर आणि रत्नागिरी तालुक्यांतही पावसात लक्षणीय घट दिसून येत आहे. त्यामुळे मान्सूनची यंदाची सुरुवात संथ आणि निराशाजनक ठरत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

हवामान विभागाने मात्र मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी परिस्थिती पोषक असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत कोकणातील पावसाचा जोर वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शेतकरी, मच्छीमार आणि नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!