मुख्य बातमीरत्नागिरी जिल्हा

लोटे एमआयडीसीत गुटखा रॅकेटचा पर्दाफाश

भाजपा नेते आणि माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर यांची मकोका अंतर्गत कारवाईची मागणी

खेड : राज्यात गुटखाबंदी लागू असतानाही तालुक्यातील लोटे एमआयडीसी परिसरात मोठ्या प्रमाणावर गुटक्याचा साठा आणि वितरण सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) कार्यकर्ते संजय आखाडे यांनी केलेल्या कथित स्टिंग ऑपरेशनमधून हा प्रकार उघड झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोटे एमआयडीसी परिसरातील एका गोदामात लाखो रुपयांचा गुटखा साठवून ठेवण्यात आला असून रात्रीच्या वेळी दुचाकींच्या माध्यमातून त्याचे वितरण केले जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भातील काही व्हिडिओ आणि पुरावे पत्रकार परिषदेत सादर करण्यात आल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, खेडचे माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे कोकण विभागातील नेते ॲड. वैभव खेडेकर यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. राज्याचे अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांनी गुटखा माफियांवर मकोका अंतर्गत कारवाईचे आदेश दिले असल्याचा उल्लेख करत, या प्रकरणातही मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली.

पत्रकार परिषदेत बोलताना वैभव खेडेकर म्हणाले की, राज्यात गुटकाबंदी असली तरी प्रत्यक्षात अनेक ठिकाणी सर्रास गुटक्याची विक्री होत आहे. याबाबत जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि संबंधित यंत्रणांकडे वेळोवेळी लेखी तक्रारी देण्यात आल्या आहेत. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत कोणताही बदल झालेला दिसून येत नाही. आजही अनेक पानटपऱ्यांवर सहजपणे गुटखा उपलब्ध होत असून त्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे आणि कर्करोगासारख्या गंभीर आजारांना बळी पडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

या कथित रॅकेटमागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच प्रशासनाने त्वरित दखल न घेतल्यास आणखी पुरावे समोर आणण्याचा इशाराही देण्यात आला आहे. या आरोपांनंतर अन्न व औषध प्रशासन, पोलीस विभाग आणि इतर संबंधित यंत्रणा या प्रकरणात कोणती भूमिका घेतात आणि पुढे काय कारवाई करतात, याकडे आता संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!