स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद
११ मतदारसंघांत ९५ टक्क्यांहून अधिक मतदान

मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था (विधानपरिषद) निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार मतदान झालेल्या ११ मतदारसंघांमध्ये बहुतांश ठिकाणी ९५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदानाची नोंद झाली आहे. तर सहा मतदारसंघांत उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने तेथे मतदानाची आवश्यकता भासली नाही.
मतदान झालेल्या मतदारसंघांमध्ये भंडारा-गोंदिया येथे शंभर टक्के मतदान झाले. त्यानंतर नागपूर येथे ९८.५ टक्के, सोलापूर व जळगाव येथे प्रत्येकी सुमारे ९७ टक्के, नांदेड येथे ९९ टक्के, अमरावती येथे ९४ टक्के, धाराशिव-लातूर-बीड येथे ९७ टक्के,छत्रपती संभाजीनगर-जालना येथे ९९ टक्के, परभणी-हिंगोली येथे ९९ टक्के, नाशिक येथे सुमारे ९७ टक्के, तर सांगली-सातारा येथेही मोठ्या प्रमाणात मतदान झाले.
दरम्यान, अहिल्यानगर, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, ठाणे-पालघर, यवतमाळ, पुणे तसेच रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या सहा मतदारसंघांमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने मतदान प्रक्रिया झाली नाही.
राज्यातील मतदानाची टक्केवारी पाहता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रतिनिधींनी निवडणूक प्रक्रियेत सक्रिय सहभाग नोंदविल्याचे चित्र दिसून आले आहे. आता सर्वांचे लक्ष मतमोजणी आणि निकालाकडे लागले आहे.


