डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचे तहसील प्रशासनाचे आवाहन

राजापूर : केंद्र व राज्य शासनाच्या विविध अर्थसहाय्य योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांनी आपले डिजिटल लाइफ सर्टिफिकेट (DLC) अर्थात हयातीचे प्रमाणपत्र ३० जूनपूर्वी सादर करावे, असे आवाहन येथील तहसीलदार यांनी केले आहे.
ग्रामीण विकास मंत्रालयाने लाभार्थ्यांचे हयातीचे प्रमाणपत्र विनाशुल्क ऑनलाइन तयार करण्यासाठी ‘Beneficiary Satyapan App’ विकसित केले आहे. या प्रणालीच्या माध्यमातून इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ अर्थसहाय्य योजना, संजय गांधी योजना तसेच श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना अंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाइन सादर करता येणार आहे
हयातीचे प्रमाणपत्र ऑनलाइन तयार करण्यासाठी संबंधित लाभार्थ्यांचा आधार कार्ड व मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. लाभार्थ्याकडे अँड्रॉइड मोबाईल उपलब्ध नसल्यास त्यांचे नातेवाईक किंवा अन्य व्यक्तीदेखील आपल्या मोबाईलमध्ये Aadhaar Face RD व Beneficiary Satyapan App डाउनलोड करून हयातीचे प्रमाणपत्र भरू शकतात.
ज्या लाभार्थ्यांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना ऑनलाइन प्रमाणपत्र तयार करताना अडचणी येत असतील, त्यांनी आपल्या गावातील संबंधित ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याशी संपर्क साधावा. तसेच तहसील कार्यालय, राजापूर येथील संजय गांधी शाखेत ३० जून २०२६ पूर्वी कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी प्रत्यक्ष उपस्थित राहूनही हयातीचे प्रमाणपत्र सादर करता येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
शासनाच्या योजनांचा लाभ अखंडितपणे सुरू राहण्यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांनी मुदतीपूर्वी हयातीचे प्रमाणपत्र सादर करून महसूल प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार विकास गंबरे यांनी केले आहे.



