खत पुरवठ्याबाबत शेतकऱ्यांनी चिंता करू नये; अडचण असल्यास थेट संपर्क साधा : आमदार शेखर निकम

चिपळूण : खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शेतकऱ्यांना खतांचा पुरेसा व वेळेवर पुरवठा व्हावा यासाठी शासनाकडून आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून शेतकऱ्यांनी खतटंचाईबाबत चिंता करू नये, असे आवाहन चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी केले आहे. खतांच्या उपलब्धतेसंदर्भात कोणतीही अडचण निर्माण झाल्यास शेतकऱ्यांनी थेट त्यांच्याशी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.
राज्य शासनाच्या मार्गदर्शनाखाली तसेच आरसीएफच्या माध्यमातून खरीप हंगामासाठी आवश्यक खतसाठा उपलब्ध करून दिला जात असल्याची माहिती त्यांनी दिली. तालुक्यातील विविध सहकारी संस्था व कृषी सेवा केंद्रांकडून प्राप्त होणाऱ्या मागणीनुसार युरिया, डीएपी, एनपीके आदी खतांचा पुरवठा करण्यात येत असून शेतकऱ्यांना वेळेत खते मिळावीत यासाठी प्रशासन व संबंधित यंत्रणा सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
खतांच्या उपलब्धतेबाबत कोणतीही समस्या निर्माण झाल्यास ती तातडीने संबंधित विभागांपर्यंत पोहोचवून त्यावर तत्काळ कार्यवाही केली जाईल, अशी ग्वाही आमदार निकम यांनी दिली. खरीप हंगाम यशस्वी व्हावा आणि कोणताही शेतकरी आवश्यक खतांपासून वंचित राहू नये, यासाठी महायुती सरकार, कृषी विभाग, आरसीएफ आणि प्रशासन यांच्यात सातत्याने समन्वय साधला जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून त्यांच्या हितासाठी शासन आणि लोकप्रतिनिधी कटिबद्ध असल्याचे सांगत, अफवांवर विश्वास न ठेवता अडचण असल्यास तात्काळ संपर्क साधून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहनही आमदार निकम यांनी केले.



