खेड तालुक्यातील पूरस्थिती नियंत्रणात
नागरिकांनी विनाकारण घराबाहेर न पडण्याचे उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांचे आवाहन

खेड : जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीच्या जवळ पोहोचली असली, तरी खेड शहरात अद्याप पूराचे पाणी शिरलेले नाही. प्रशासनाची सर्व यंत्रणा सतर्क असून परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांनी दिली.
त्या म्हणाल्या की, “खेड नगरपालिकेची टीम, लोकप्रतिनिधी, महसूल प्रशासन तसेच अन्य सर्व यंत्रणा २४ तास सतर्क आहेत. आवश्यकतेसाठी एनडीआरएफचे पथक चिपळूण येथे दाखल असून गरज भासल्यास तातडीने त्यांची मदत घेण्यात येईल. तालुक्यात मुसळधार पावसामुळे काही ग्रामीण भागात रस्ते खचणे, पुलांवर पाणी येणे अशा घटना घडत आहेत. या सर्व घटनांची माहिती तातडीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला देण्यात येत असून सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी जाऊन आवश्यक उपाययोजना करत आहेत.”
नागरिकांना आवाहन करताना श्रीमती पाटील म्हणाल्या की, तालुक्यातील सर्व नद्या, ओढे आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे केवळ पर्यटनाच्या उद्देशाने किंवा पाण्याचा आनंद घेण्यासाठी धोकादायक ठिकाणी जाऊ नये. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी बोगद्यापासून परशुराम घाटापर्यंतच्या परिसरावर प्रशासनाचे बारकाईने लक्ष असल्याचे त्यांनी सांगितले. महामार्गावर काही ठिकाणी पाणी साचणे किंवा सुरू असलेल्या कामांमुळे अडचणी निर्माण झाल्यास संबंधित ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवला जात असून त्यांची यंत्रणाही पूर्णपणे सज्ज आहे.
दरम्यान, खोपी येथील शिंदेवाडी परिसरात दरड कोसळल्याच्या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे पथक घटनास्थळी कार्यरत असून तात्पुरता भराव टाकण्याचे काम सुरू आहे. तसेच वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्याचे नियोजन करण्यात आले असून नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील यांनी स्पष्ट केले.



