शेतीचा खरा शिल्पकार : बैलांना नांगरणीसाठी घडविणारे आत्माराम नारायण सोगम
अनुभव, संयम आणि मायेच्या बळावर जपली पारंपरिक शेतीची अनोखी परंपरा

राजापूर (राजू जोगळे) : आधुनिक यंत्रसामग्रीच्या युगातही कोकणातील अनेक भागांत शेतीसाठी बैलांचे महत्त्व आजही कायम आहे. मात्र नवीन किंवा उधळ्या बैलांना नांगरणीसाठी तयार करणे हे अत्यंत कौशल्याचे आणि संयमाचे काम आहे. हे कौशल्य आपल्या अनुभवाच्या बळावर जपणारे धोपेश्वर–पन्हळे (ता. राजापूर) येथील ज्येष्ठ शेतकरी आत्माराम नारायण सोगम (मामा) हे आज परिसरातील शेतकऱ्यांसाठी विश्वासाचे नाव बनले आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून आत्माराम मामा नवीन तसेच मस्तीखोर बैलांना शांतपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने नांगरणीचे प्रशिक्षण देत आहेत. बैलाचा स्वभाव, त्याची ताकद, भीती आणि वागण्याची पद्धत यांचा अचूक अभ्यास करून ते त्याला शेतीच्या कामासाठी तयार करतात. त्यामुळे कितीही हट्टी किंवा उधळ्या बैलालाही ते अल्पावधीत शिस्तबद्ध आणि नांगरणीसाठी सक्षम बनवतात.
विशेष म्हणजे, बैलांना प्रशिक्षण देताना ते कधीही कठोरतेचा किंवा मारहाणीचा आधार घेत नाहीत. माया, संयम आणि सातत्यपूर्ण सराव यांच्या बळावर जनावरांशी संवाद साधत त्यांचा विश्वास संपादन करण्याची त्यांची हातोटीच त्यांच्या यशाचे गमक मानली जाते. त्यामुळे त्यांच्या प्रशिक्षणातून तयार झालेले बैल पुढे शेतीची सर्व कामे सहज आणि शिस्तीत पार पाडतात.
याच विश्वासामुळे राजापूर तालुक्यासह परिसरातील अनेक शेतकरी आपल्या नवीन बैलांना आत्माराम मामांकडे प्रशिक्षणासाठी आणतात. काही दिवसांच्या प्रशिक्षणानंतर हे बैल नांगरणीसह शेतीतील इतर कामांसाठीही पूर्णपणे तयार होतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ, श्रम आणि खर्च मोठ्या प्रमाणात वाचण्यास मदत होते.
आजच्या यांत्रिकीकरणाच्या काळात बैलांना प्रशिक्षण देणारे कुशल व्यक्ती दिवसेंदिवस दुर्मिळ होत असताना आत्माराम नारायण सोगम यांनी ही पारंपरिक कला जिद्दीने जपली आहे. त्यांच्या कार्यामुळे शेतीची जुनी परंपरा टिकून राहण्यास हातभार लागत असून अनेक तरुण शेतकऱ्यांनाही पारंपरिक शेतीचे महत्त्व समजत आहे.
शेती आणि शेतकऱ्यांप्रती असलेली त्यांची निष्ठा, जनावरांविषयीचे प्रेम आणि निःस्वार्थ सेवा यामुळे आत्माराम नारायण सोगम हे खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील शेतीचे शिल्पकार ठरले आहेत. त्यांच्या कार्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे श्रम हलके होत असून पारंपरिक शेतीची समृद्ध परंपरा आजही जिवंत राहिली आहे. अशा या मेहनती, अनुभवी आणि शेतीसेवेला वाहून घेतलेल्या आत्माराम मामांच्या कार्याला मनःपूर्वक सलाम.



