मुख्य बातमी

ज्येष्ठांची काळजी घेणे ही तरुणांची सामाजिक जबाबदारी : संदीप परब

रत्नागिरी : येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या एस. पी. हेगशेट्ये कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालय यांच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे २३ जुलै राष्ट्रीय प्रसारण दिनानिमित्त ‘आश्रम व्यवस्था व तरुणांनी आपल्या ज्येष्ठांची घ्यावयाची काळजी’ या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून जीवन आनंद संस्थेचे संस्थापक संदीप परब उपस्थित होते. तसेच उपव्यवस्थापक आशिष कांबळी आणि जनसंपर्क अधिकारी महाबळेश्वर कामत यांची प्रमुख उपस्थिती होती. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गवाळे यांनी कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी श्री. परब यांनी आश्रम व्यवस्थेची संकल्पना स्पष्ट करताना तरुणांनी आपल्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींची प्रेमाने, आदराने व संवेदनशीलतेने काळजी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. ज्येष्ठांच्या अनुभवाचा आदर करून त्यांना भावनिक आधार देणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हर्षदा शिऊडकर यांनी केले. विज्ञान विभाग प्रमुख प्रा. अहलाम खान कला, विभागप्रमुख प्रा. वर्षा कुबल यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख प्रा. सुशील साळवी यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच सहकार्य केले.

कार्यक्रमास महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये ज्येष्ठांप्रती आदर, संवेदनशीलता आणि सामाजिक बांधिलकीची भावना निर्माण झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!