राजापुरातील १३ मोकाट गुरांची चिपळूण गोशाळेत रवानगी
नगरपालिकेची धरपकड मोहीम सुरूच; गुरेमालकांना कठोर इशारा

राजापूर : शहरातील मोकाट गुरांच्या वाढत्या समस्येवर राजापूर नगरपालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेत विशेष धरपकड मोहिमेत पकडलेल्या १३ मोकाट गुरांची सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण करून चिपळूण येथील गोशाळेत रवानगी केली आहे. गुरेमालकांकडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

राजापूर शहरातील बाजारपेठ, प्रमुख रस्ते आणि वर्दळीच्या ठिकाणी मोकाट गुरांचा वावर वाढल्याने व्यापारी, नागरिक, विद्यार्थी तसेच वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. गुरुवारच्या आठवडा बाजाराच्या दिवशी बाहेरून येणारे व्यापारी आणि ग्राहक यांनाही या समस्येचा सामना करावा लागत होता. मोकाट गुरांमुळे शहरात लहान-मोठ्या अपघातांच्या घटनाही घडल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती.
यापूर्वी पालिकेकडून पकडण्यात आलेली गुरे दंड वसूल करून संबंधित मालकांच्या ताब्यात देण्यात आली होती; मात्र काही दिवसांतच तीच गुरे पुन्हा शहरात मोकाट फिरताना आढळून आल्याने प्रशासनाने यावेळी अधिक कठोर कारवाईचा निर्णय घेतला.
लोकनियुक्त नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलीफे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेतील निर्णयानुसार मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी विशेष मोहीम राबवून १३ मोकाट गुरांची धरपकड केली. ही गुरे जुन्या रेस्ट हाऊस परिसरातील कोंडवाड्यात ठेवण्यात आली होती. सुमारे २० ते २५ दिवस नगरपरिषदेच्या वतीने त्यांना चारा, पाणी आणि आवश्यक देखभाल पुरविण्यात आली.
घंटागाडीच्या माध्यमातून गुरेमालकांना वारंवार आवाहन करून दंड भरून गुरे ताब्यात घेण्याचे आवाहन करण्यात आले. काही मालकांनी दंड भरून आपली गुरे परत नेली व भविष्यात गुरे मोकाट न सोडण्याबाबत त्यांना सूचना देण्यात आल्या. मात्र उर्वरित १३ गुरांचे मालक पुढे न आल्याने त्यांची वैद्यकीय तपासणी करून आवश्यक शासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. त्यानंतर या सर्व गुरांची चिपळूण येथील गोशाळेत सुरक्षित रवानगी करण्यात आली.
दरम्यान, शहरातील मोकाट गुरांविरोधातील धरपकड मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. गुरेमालकांनी आपली गुरे मोकाट सोडू नयेत, अन्यथा नियमानुसार दंडात्मक कारवाईसह कठोर उपाययोजना करण्यात येतील, असा इशाराही प्रशासनाने दिला आहे.



