लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी व रत्नागिरी नगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने भव्य तिरंगा बाईक रॅली

रत्नागिरी : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी आणि रत्नागिरी नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी (१५ ऑगस्ट) सकाळी १० वाजता भव्य “तिरंगा बाईक रॅली” आयोजित करण्यात आली आहे.
साळवी स्टॉप ते जयस्तंभ आणि पुन्हा साळवी स्टॉप असा रॅलीचा मार्ग असून, “प्लास्टिकमुक्त रत्नागिरी” या जनजागृती अभियानाला चालना देणे हा या रॅलीचा मुख्य उद्देश आहे. “प्लास्टिकमुक्त अभियान” या विषयावर जनजागृती करणारे बॅनर, फलक किंवा संदेश तयार करून रॅलीमध्ये सहभागी होण्याचे आवाहन समस्त रत्नागिरीकरांना करण्यात आले आहे.
ही रॅली केवळ तिरंग्याचा उत्सव नसून, स्वच्छ, सुंदर आणि प्लास्टिकमुक्त रत्नागिरीचा संकल्प करण्यासाठीची एक सामूहिक चळवळ आहे. रॅलीदरम्यान वाहतुकीचे सर्व नियम व शिस्त पाळण्यात येणार असून, नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या देशभक्तीपर आणि सामाजिक जनजागृतीच्या उपक्रमात जास्तीत जास्त रत्नागिरीकरांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचे अध्यक्ष लायन सुमित ओसवाल व त्यांची संपूर्ण टीम तसेच रत्नागिरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या वतीने करण्यात आले आहे.



