शिष्यवृत्ती परीक्षेत आबलोलीतील चंद्रकांत बाईत विद्यालयाचे यश

आबलोली (संदेश कदम) : गुहागर तालुक्यातील लोकशिक्षण मंडळ आबलोली संचलित चंद्रकांत बाईत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इयत्ता सातवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयातील एकूण नऊ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. पैकी आठ विद्यार्थी शिष्यवृत्ती पात्र ठरले यापैकी अनुज अतिश रेपाळ आणि हिरण्या योगेश पालशेतकर यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळवून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
तसेच चौथी पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यालयातील कुमारी श्रेया शिवाजी साळवे हिने गुणवत्ता यादीत स्थान मिळवून उल्लेखनीय यश मिळवून विद्यालयाचा नावलौकिक वाढवला या तिन्ही गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे कार्याध्यक्ष व सर्व संचालक मुख्याध्यापक मार्गदर्शक शिक्षक कर्मचारी तसेच पालकांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे प्रोत्साहन लाभल्याने हे यश मिळाले आहे
अनुज अतिश रेपाळ, हिरण्या योगेश पालशेतकर आणि श्रेया शिवाजी साळवे यांच्या या यशामुळे विद्यालयाच्या शैक्षणिक गुणवत्तेत आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून त्यांच्या यशामुळे विद्यालयातील इतर विद्यार्थ्यांनाही स्पर्धा परीक्षांसाठी प्रेरणा मिळाली आहे.



