मुख्य बातमी

रत्नागिरी जिल्हा परिषदेकडून आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

रत्नागिरी : उद्या (५ सप्टेंबर) असलेल्या शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा केली आहे. जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधून एकूण १० शिक्षकांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी ४ सप्टेंबर रोजी पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांची नावे जाहीर केली. प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीषा जगदाळे यांनी याबाबत माहिती दिली.

मंडणगड तालुक्यातील जि.प. मराठी शाळा तिडे आदिवासीवाडी येथील उपशिक्षक निलेश तुळशीराम लोखंडे, दापोली तालुक्यातील जि.प. आदर्श शाळा भरणे कोंडारण येथील दिनेश कानू चिपटे, खेड तालुक्यातील जि.प. शाळा माणी नं. १ येथील पदवीधर विषय शिक्षिका दिप्ती दिलीप यादव, चिपळूण तालुक्यातील जि.प. शाळा चिवेली वरची येथील पदवीधर शिक्षक विनोद जानू हुंबरे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच गुहागर तालुक्यातील जि.प. आदर्श शाळा वेलदूर घरटवाडी येथील उपशिक्षक प्रभू रघुनाथ हबर्डे, संगमेश्वर तालुक्यातील जि.प. आदर्श शाळा पूर येथील पदवीधर शिक्षक राजेश अर्जुन सावंत, रत्नागिरी तालुक्यातील जि.प. शाळा शिवार आबेरे नं. २ येथील उपशिक्षिका रश्मी राजन वाडेकर, लांजा तालुक्यातील जि.प. आदर्श पन्हळे नं. १ येथील पदवीधर शिक्षक दिलीप शंकर चव्हाण आणि राजापूर तालुक्यातील जि.प. आदर्श शाळा पाथर्डे येथील उपशिक्षिका स्नेहा सुहास काडगे यांचाही पुरस्कारार्थी शिक्षकांमध्ये समावेश आहे.

दरम्यान, कला पुरस्कारासाठी संगमेश्वर तालुक्यातील जि.प. शाळा साडवली सह्याद्रीनगर येथील उपशिक्षक संदेश प्रकाश झेपले यांची विशेष पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले प्रयत्न तसेच शाळेच्या प्रगतीमध्ये दिलेले योगदान या बाबींचा विचार करून या शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. पुरस्कारासाठी निवड झालेल्या सर्व शिक्षकांचे शिक्षण विभागासह विविध स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!