आम्ही शेतकरी- कृषीमुख्य बातमी

शेतकऱ्यांना बांधावर खते मिळाली पाहिजेत : पालकमंत्री डॉ. उदय सामंत

खरीप हंगाम मान्सूनपूर्व नियोजन सभा

रत्नागिरी : खतासाठी शेतकऱ्यांना संघाच्या कार्यालयात जायला लागू नये. शेतकऱ्यांना त्यांच्या बांधावर खते मिळाली पाहिजेत, अशी सूचना देतानाच औषधे, खते, बियाणे दर्जेदार हवीत, असे निर्देशही पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी कृषी विभागाला दिले.

जिल्हा नियोजन समिती सभागृहात खरीप हंगाम २०२५ मान्सूनपूर्व नियोजन सभेचे आयोजन करण्यात आले होते. आमदार शेखर निकम, आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सामंत यांनी खैराची रोपे मोफत देण्याबाबत प्रथम वन विभागाकडून आढावा घेतला. ते म्हणाले, तयार असणारी ३ लाख ७० हजार रोपे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार त्यांना पुरवावीत. त्याचबरोबर ऊर्वरीत मागणीच्या पूर्ततेसाठी अतिरिक्त रोपांची व्यवस्था करावी. खैराची झाडे दिल्यानंतर महिन्याला किती उत्पन्न मिळेल, याची माहिती आमच्यासह शेतकऱ्यांना उपलब्ध करुन द्यावी. कृषी विभागाने पाच गोदामांचा फायदा शेतकऱ्यांसाठी करुन द्यावा. तृणधान्य क्षेत्र वाढविण्यासाठी प्रचार प्रसिध्दी करावी. ॲग्रीस्टॅक या शासनाच्या योजनेमध्ये प्राधान्याने लक्ष घालावे. १५ दिवसांत टार्गेट पूर्ण करावे.

शासनाच्या योजनांचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांना देण्यासाठी कृषी विभागाने मनापासून प्रयत्न करावेत. त्याबाबत प्रचार, प्रसिध्दी करावी. केंद्र शासन आणि राज्यशासन यांच्या लाभापासून शेतकऱ्यांना अजिबात वंचित ठेवू नये. त्यासाठी काय अंमलबजावणी केली याची माहिती दर तीन महिन्यांनी लोकप्रतिनिधींना द्यावी. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी यावेळी औषधे, खते, भातलागवड क्षेत्र, नारळ लागवड क्षेत्र याबाबत सविस्तर माहिती दिली.

१० ते १२ मे होणाऱ्या कृषी प्रदर्शन, आंबा महोत्सव आणि पशू-पक्षी प्रदर्शनाच्या क्यूआर कोड चे लोकार्पण यावेळी करण्यात आले. उपवनसंरक्षक गिरिजा देसाई यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!