आम्ही शेतकरी- कृषीमुख्य बातमी

कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताह व कृषी विकास परिषदेचे उद्घाटन

पालकमंत्री डॉ.सामंत यांच्या कृषी प्रदर्शनाला शुभेच्छा

रत्नागिरी : जिल्हा नियोजन समिती, प्रकल्प संचालक (आत्मा), कृषी विभाग जिल्हा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने येथील स्व. प्रमोद महाजन क्रीडा संकुलात आजपासून तीन दिवस होणाऱ्या कृषी तंत्रज्ञान विस्तार सप्ताह व कृषी विकास परिषदेचे उद्घाटन अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांच्या हस्ते करण्यात आले. पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी या परिषदेला दूरध्वनीवरून आणि चित्रफितीच्या माध्यमातून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. उद्या सकाळी ८ वाजता मारुती मंदिर ते जयस्तंभ मार्गावर होणाऱ्या तिरंगा रॅलीस मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देखील यावेळी पालकमंत्र्यांनी केले.

या उद्घाटन सोहळ्यास अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, प्रातांधिकारी जीवन देसाई, उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल देसाई, विजयसिंह जाधव, तहसिलदार राजाराम म्हात्रे, प्रकल्प संचालक (आत्मा) विजय बेतीवार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्रीकांत हावळे उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. सामंत यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, “या कृषी प्रदर्शनासाठी मी व्यक्तीश: उपस्थित राहणार होतो. भारत-पाकिस्तान युध्दात जम्मू काश्मीरमध्ये कर्तव्यावर असताना महाराष्ट्रातील घाटकोपर मधील जवान मुरली नाईक यांना वीरमरण आले आहे. आंध्रप्रदेशातील त्यांच्या मूळ गावी त्यांचे पार्थिव आणण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी, त्यांच्या कुटुंबियांच्या सांत्वनासाठी मी इकडे आलो आहे. राज्य शासनाने निर्णय घेतला आहे, उद्या सकाळी ८ वाजता तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. मारुती मंदिर ते जयस्तंभ या मार्गावर होणाऱ्या या तिरंगा रॅलीसाठी नागरिकांनी सैनिकांचे मनोबल वाढविण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. कृषी प्रदर्शनासाठी माझ्या मन:पूर्वक शुभेच्छा.”

चित्रफितीच्या माध्यमातून संदेश देताना ते म्हणाले, “खैराचे झाड शेतकऱ्यांना मोफत देण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. काजू, आंबा बागायतदारांसाठी कुलिंग व्हॅन घेण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी मी त्यांच्या सोबत सदैव आहे, असा शब्द देतो.”

उद्घाटनानंतर उभारण्यात आलेल्या विविध स्टॉलची पाहणी करून, मार्गदर्शन करताना अपर जिल्हाधिकारी श्री. गलांडे म्हणाले, “२००४ ते २००६ या कालावधीत कृषी सहायक म्हणून काम केले आहे. पालकमंत्री महोदयांच्या कल्पक मार्गदर्शनाखाली आजचे हे कृषी प्रदर्शन भरविण्यात आले आहे. शासनाच्या ज्या विविध योजना शेतकऱ्यांसाठी आहेत त्याची माहिती या प्रदर्शनातून मिळणार आहे. भारत कृषीप्रधान देश आहे. कृषी उत्पादनाचा लोकसंख्येशी मेळ घालणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाचा उत्पादन वाढीच्या दृष्टीकोनातून लाभ घ्यावा. होणाऱ्या परिसंवादाचाही लाभ घ्यावा.” खरीप हंगामासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. सूर्यवंशी, दापोली कृषी विद्यापीठाचे संशोधन संचालक पराग हळदणकर, पशु संवर्धन उपायुक्त डॉ. सोनवले, सेंद्रीय शेती पुरस्कार प्राप्त श्री. पाठक यांनीही मनोगत व्यक्त केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. सदाफुले यांनी स्वागत प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला बळीराजा प्रतिमापूजन आणि दिपप्रज्वलन करण्यात आले. त्याचबरोबर शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पूर्वा पेठे यांनी तर कृषी उपसंचालक प्रतिक पाटील यांनी आभार प्रदर्शन केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!