खेर्डी (ता. चिपळूण) येथे दुचाकीला ट्रकची धडक बसून अपघात; विवाहितेचा मृत्यू

चिपळूण : कराड-चिपळूण मार्गावर खेर्डी येथे बुधवारी दुपारी ३.३० वाजता दुचाकीला ट्रकची धडक बसून अपघात झाला. या अपघातात विवाहितेचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी एकास गंभीर दुखापत झाली आहे. समीना नासिर चिपळूणकर (२७, खेर्डी मोहल्ला) असे अपघातात मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तसेच तिचे वडील आदम गफूर चौगुले हे गंभीर जखमी झाले आहेत.
समीना चिपळूणकर या आपल्या वडिलांच्या दुचाकीवर मागे बसून बहादूरशेख नाकाहून खेर्डीकडे जात होत्या. याचवेळी हॉटेल तेज समोर मागून येणाऱ्या डंपरची त्यांना जोरदार धडक बसली आणि ते दोघेही दुचाकी वरून रस्त्यावर कोसळले; मात्र काही क्षणात समीरा चिपळूणकर यांच्या पोटावरुन डंपरचा मागील चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर वडील गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. या अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. मात्र त्याआधीच डंपर चालक तेथून पळून गेला होता. त्याचा काहींनी शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तो कुठेही आढळून आला नाही.
समीना चिपळूणकर यांचे पती परदेशात नोकरी करतात. सध्या त्या वडिलांकडे राहत होत्या. मात्र त्यांच्या अपघाती मृत्यूमुळे चिपळूणकर व चौगुले कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.



