मुख्य बातमी

सीबीएसई अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास केवळ ६८ शब्दांत?

हा 'शौर्याचा अपमान' तात्काळ थांबवाच; छत्रपती शिवरायांचा पूर्ण इतिहास शिकवा : हिंदु जनजागृती समितीचे निवेदन

रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या इतिहासातील तेजस्वी, राष्ट्रनिष्ठ आणि सार्वकालिक प्रेरणास्थान आहेत. अशा महापुरुषांचा इतिहास केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) इयत्ता चौथी ते बारावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात केवळ ६८ शब्दांत आणि ११ ओळींत शिकवणे हे महाराजांच्या शौर्याचा, पराक्रमाचा आणि हिंदवी स्वराज्य संकल्पाचा अवमान आहे. असा अभ्यासक्रम महाराष्ट्रासाठी लागू करण्यापूर्वी, तसेच सीबीएसई अभ्यासक्रमातही छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास स्वतंत्र, सविस्तर आणि सन्मानपूर्वक समावेश तात्काळ करावा, अशा मागणीचे निवेदन आज (६ जून) हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांना देण्यात आले.

यावेळी सर्वश्री शैलेश बेर्डे, ज्ञानेश्वर राऊत, निलेश आखाडे, सौ. सायली बेर्डे, मुकेश माळी, नितीन गांगण, गणपत निवळकर, गोविंद भारद्वाज, संजय जोशी आदी उपस्थित होते. सीबीएसईच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या दैदीप्यमान इतिहासाचा समावेश करण्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली आहे. तसेच सीबीएसईचा अभ्यासक्रम राज्यासाठी लागू करण्याविषयी त्यांनी म्हटले आहे. प्रत्यक्षात सीबीएसईच्या अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढाया, राज्यकारभार, धर्मनिष्ठा, आरमार, गनिमी कावा आदींचा उल्लेखही नाही.

यापूर्वी काँग्रेस सरकारच्या काळात राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेच्या (NCERT) च्या इयत्ता ७ वीच्या ‘हमारे अतीत’ या पुस्तकांमध्ये केवळ ६ ओळींचा छत्रपती शिवरायांविषयी अवमानकारक इतिहास दिला होता. त्यालाही हिंदु जनजागृती समितीने तीव्र विरोध केल्यामुळे तो बदलावा लागला होता. गोवा सरकारलाही त्याच कारणास्तव इतिहासाचे पुस्तक मागे घेऊन स्वतंत्र नवीन प्रकरण समाविष्ट करावे लागले होते.

सीबीएसईच्या अभ्यासक्रमात विद्यार्थ्यांना ग्रीस, रोम, चीन, अमेरिका आदी परदेशी राजवटी, सम्राट व युद्धांचा अभ्यास शिकवला जातो; मात्र स्वतःच्या देशातील महान राजाविषयी अपुरे आणि तुटक ज्ञान दिले जाते, ही अत्यंत खेदजनक बाब आहे. जगभरातील विविध देशांच्या सैन्यदलांमध्ये अफझलखानवध, गनिमी कावा यांसारख्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्धनीतीचा अभ्यास केला जातो, तर तोच इतिहास भारतात का शिकवला जात नाही, हा प्रश्न अनुत्तरित राहतो. त्यामुळे बालभारतीच्या इयत्ता ४ थी व ७ वीच्या इतिहासपुस्तकांतील सुसंगत व सप्रमाण मजकुराचा अभ्यास करून सीबीएसईच्या इतिहास अभ्यासक्रमात इयत्ता ६ वी ते १० वीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनकार्य, युद्धनीती, राज्यकारभार, धर्मनिष्ठा आणि राष्ट्रनिष्ठा यांचा समावेश असलेला पूर्ण व तथ्याधारित अभ्यासक्रम तात्काळ तयार करावा, अशी मागणी समितीने केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!