मुख्य बातमी

धामेली (चिपळूण) गावातील अपर्णा महाडिक यांचा गुजरात विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू

चिपळूण : तालुक्यातील धामेली (भोजनेवाडी) गावातील सुपुत्रवधू आणि एअर इंडिया या प्रतिष्ठित विमान कंपनीमध्ये क्रू मेंबर म्हणून कार्यरत असलेल्या अपर्णा महाडिक (वय ३५) यांचे आज (१२ जून) गुजरातमध्ये झालेल्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले.

अपर्णा महाडिक या खासदार सुनील तटकरे यांचे भाचे अमोल महाडिक यांच्या पत्नी होत. गेल्या काही वर्षांपासून त्या एअर इंडिया सेवेत कार्यरत होत्या. गुरुवारी नेहमीप्रमाणे ड्युटीवर असताना, तांत्रिक बिघाडामुळे विमान अपघात घडला आणि या दुर्घटनेत अपर्णा यांना प्राण गमवावे लागले.

त्यांचे पती अमोल महाडिक हेही एअर इंडिया सेवेत कार्यरत आहेत. अपर्णा यांच्या अपघाती निधनाची वार्ता समजताच त्यांच्या कुटुंबियांमध्ये, नातेवाईकांत आणि सहकाऱ्यांमध्ये शोककळा पसरली. त्यांची विनम्र, समजूतदार आणि व्यावसायिकतेची ओळख असलेली ही धडाडीची महिला अचानक हरपल्याने संपूर्ण कोकण हळहळला आहे.

धामेली गावातही या बातमीने शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे. त्यांच्या अंत्यविधीची माहिती नातेवाईकांकडून लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

दरम्यान, चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी अपर्णा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. “अपर्णा महाडिक यांच्या अपघाती निधनाने रायगड व रत्नागिरी जिल्ह्यांनी एक जबाबदार, कर्तबगार महिला गमावली आहे. त्यांच्या कुटुंबियांप्रती मी मनःपूर्वक संवेदना व्यक्त करतो. हा अपघात केवळ एका कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण कोकणसाठीच मोठी धक्का देणारी घटना ठरली,” असे ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!