आम्ही शेतकरी- कृषीमुख्य बातमी

भात पिकासाठी शिफारस केलेल्या एकात्मिक खत व्यवस्थापनाचा अवलंब करून शेतकऱ्यांनी उत्पादन वाढवावे

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले

रत्नागिरी : रासायनिक खतांवरील अवलंबित्व कमी करून जमिनीचे आरोग्य सुधारण्यासाठी आणि पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी युरियाला (नत्र) पर्यायी खतांचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. भात पिकासाठी शिफारस केलेल्या एकात्मिक खत व्यवस्थापनाचा अवलंब करून शेतकरी बांधव उत्पादन वाढवू शकतात. खत मात्रा, त्याचा योग्य वापर आदीसाठी आपल्या परिसरातील सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा,” असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.

शिफारस केलेली खत मात्रा

भात पिकासाठी प्रति हेक्टरी १०० किलोग्रॅम नत्र (N), ५० किलोग्रॅम स्फुरद (P) आणि ५० किलोग्रॅम पालाश (K) देण्याची शिफारस आहे. पहिला हप्ता चिखलणीच्या वेळी हेक्टरी ४० किलो नत्र, ५० किलो स्फुरद आणि ५० किलो पालाश दुसरा हप्ता फुटवे फुटण्याच्या वेळी हेक्टरी ४० किलो नत्र आणि तिसरा हप्ता पिक फुलोऱ्यात असताना हेक्टरी २० किलो नत्र या शिफारशीनुसार वापर करावा.

रासायनिक खतांसाठी इतर पर्याय

गिरीपुष्पाचा वापर – चिखलणी करताना हेक्टरी १० टन गिरीपुष्पाचा पाला चिखलणीच्या वेळी जमिनीत गाडावा. यामुळे नत्राची गरज पूर्ण होण्यास मदत होईल. किवा जर चिखलणीच्या वेळी हेक्टरी ५ टन गिरीपुष्पाचा पाला वापरला, तर शिफारस केलेल्या नत्राच्या (युरीया) मात्रेमध्ये ५० टक्के कपात करावी.

जैविक खतांचा वापर (ॲझोटोबॅक्टर) रोप प्रक्रिया : भात रोपे लावण्यापूर्वी ५०० मिली द्रव अँझोटोबॅक्टर १५ ते २० लिटर पाण्यात मिसळावे. या द्रावणात २१ ते ३० दिवसांची निरोगी रोपे २० ते ३० मिनिटे भिजवून ठेवावीत. द्रावणात भिजवून ठेवल्यानंतर एक तासाने या रोपांची लागवड करावी. अँझोटोबॅक्टर हे नत्र स्थिरीकरणाचे (Nitrogen Fixation) काम करते. यामुळे सुमारे २० ते २५ टक्के खताची बचत होते आणि जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते.

भात पिकाकरीता खालील खतांची वापर करण्याची प्रति गुंठा मात्रा:

चिखलणीच्या / लावणीच्यावेळी ३ किलो, NPK(१५:१५:१५) किंवा २ किलो + १/२ किलो NPK (१०:२६:२६ + युरिया). लावणीनंतर ३० दिवसांनी १/२ किलो (युरिया) किंवा १/२ किलो (युरिया). लावणीनंतर ६० दिवसांनी १/२ किलो (युरिया) किंवा १/२ किलो.

फवारणीसाठी खत : NPK (१९:१९:१९) : भात पिकावर हे पाण्यात विरघळणारे खत विविध तीन टप्प्यामध्ये वापरावयाचे असते.पहिली वेळ पिकाच्या फुटवाच्या वेळेस, दुसरी वेळ पिक फुलोऱ्यावर आल्यावर आणि तिसरी वेळ भात पिकाच्या दाणे भरण्याची वेळ. प्रत्येक फवारणीच्या वेळेस प्रति ५० ग्राम प्रति १० लिटर पाण्यात या प्रमाणात वापरावे.

वरील उपाययोजनांचा अवलंब केल्यास रासायनिक खतांवरील खर्च कमी होऊन जमिनीची सुपीकता टिकवून ठेवण्यास मदत होईल. अधिक माहितीसाठी आपल्या परिसरातील सहाय्यक कृषी अधिकारी, उप कृषी अधिकारी.मंडळ कृषी अधिकारी व तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!