जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेत पटवर्धन हायस्कूलचे घवघवीत यश
नित्या संदीप फणसे हिची राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी निवड

रत्नागिरी : जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण विभाग जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ही स्पर्धा २४ जुलै रोजी पटवर्धन हायस्कूल येथे झाली. जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी जिल्ह्यातील अनेक शाळा सहभागी झाल्या होत्या. या जिल्हास्तरीय प्रश्नमंजुषेचा निकाल ५ ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आला. यात पटवर्धन हायस्कूलच्या नित्या संदीप फणसे (इयत्ता नववी अ) जिल्ह्यात प्रथम क्रमांक व कुमार मार्तंड नरेंद्र गावंड (इयत्ता आठवी अ) जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले. नित्या फणसे हिची राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. ही स्पर्धा १० ऑगस्ट रोजी नेरूळ (नवी मुंबई) येथे होणार आहे.
नित्या फणसे आणि मार्तंड गावंड यांनी मिळवलेल्या या यशाबद्दल आज (६ ऑगस्ट) सकाळी जिल्हा शासकीय रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर जगताप यांच्या हस्ते नित्या फणसे व तिचे वडील संदीप फणसे, मार्तंड गावंड यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी भारत शिक्षण मंडळाचे उपकार्याध्यक्ष श्रीराम भावे, कार्यवाह दादा वणजू आणि सहकार्यवाह संजय जोशी, पटवर्धन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती जानकी घाटविलकर तसेच ज्युनिअर कॉलेजचे प्राध्यापक तानाजी वाघमारे, पटवर्धन हायस्कूलच्या विज्ञान प्रमुख श्रीमती शिरधनकर, ज्येष्ठ विज्ञान शिक्षक श्री. राठोड व प्रशालेचे सर्व शिक्षक आणि संस्थेचे पदाधिकारी यांनी नित्या फणसे व मार्तंड गावंड यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.



