छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर सेवा पंधरवडा

रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर या कालावधीमध्ये “सेवा पंधरवडा” राज्यात यशस्वीपणे राबविण्याच्या अनुषंगाने महसूल मंत्र्यांनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सव्दारे सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांची बैठक घेऊन मार्गदर्शन केले.
महसूल विभाग हा जनतेच्या दैनंदिन समस्या आणि जिव्हाळ्याच्या विषयांशी अत्यंत जवळून संबंध असलेला विभाग आहे. सामान्य जनतेला दिलासा देण्यासाठी महसूल प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक होण्याची आवश्यकता आहे. ही बाब विचारात घेऊन भारताचे पंतप्रधान राष्ट्रनेता नरेंद्र मोदी यांचा आगामी जन्मदिन १७ सप्टेंबर ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती २ ऑक्टोबर या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातंर्गत “सेवा पंधरवडा” साजरा करण्याबाबतची बाब शासनाच्या विचाराधीन होती. सेवा पंधरवड्यात राबवावयाचे उपक्रम हे यापूर्वीपासून राबविण्यात येत असून पंधरवड्या दरम्यान व त्यानंतरही निरंतरपणे राबविले जाणारे उपक्रम आहेत. मात्र या कालावधीत सदर उपक्रम मोहीम स्वरुपात युद्धपातळीवर राबवायाचे असून त्यानुषंगाने महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई यांच्याकडील क्र/ मराअ-2025/प्र.क्र. 63 (ई ऑफिस क्र. 1296378)/समन्वय- 1 दिनांक 29 ऑगस्ट 2025 रोजी पुढीलप्रमाणे शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे.
“सेवा पंधरवडा” कालावधीमध्ये प्रत्येक दिवशी समाजाच्या विविध घटकातील नागरिकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिनस्त क्षेत्रीय कार्यालयामार्फत पुढील प्रमाणे विशेष मोहीम कार्यक्रम / उपक्रम / शिबीरे यांचे आयोजन टप्प्यामध्ये करण्यात येणार आहे.
पहिला टप्पा “पाणंद रस्ते विषयक मोहीम” या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या टप्प्या अंतर्गत अमरावती जिल्ह्यात जिल्हा अधिक्षक भूमी अभिलेख व उप अधिक्षक भूमी अभिलेख यांच्या समन्वयातून पाणंद रस्ते मॅपिंगचा अत्यंत स्तुत्य कार्यक्रम राबविण्यात आलेला आहे. त्याच धर्तीवर पाणंद रस्ते गाव नकाशावर चिन्हांकित करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये शिव/पाणंद रस्त्यांचे सर्वेक्षण करणे, ज्या पाणंद रस्त्यांची नोंद निस्तार पत्रक / वाजिब उल अर्जामध्ये करण्यात आलेली नाही, त्याची नोंद घेण्याबाबत कार्यवाही करणे, शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करुन देण्यासाठी संमतीपत्र घेणे, रस्ता अदालत आयोजित करून शेतरस्त्यांचे प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे, शेतरस्त्यांची मोजणी व सीमांकन करणे इत्यादी कार्यवाही करण्यात येणार आहे.
दुसरा टप्पा अ) “सर्वांसाठी घरे या उपक्रमासाठी पूरक उपक्रम २३ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर पर्यंतच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या टप्पा अंतर्गत घरे बांधण्यासाठी निर्बांध्यरित्या वाटपास उपलब्ध असलेली शासकीय जमीन कब्जेहक्काने प्रदान करण्यात येणार आहेत, सदर उपक्रमासाठी अस्तित्वातील रहिवासी प्रयोजनासाठी असलेली शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे नियमातील तरतुदीनुसार नियमानुकूल करणेत येणार आहे, महसूल विभाग, शासन निर्णय दि. १४.१२.१९९८ मधील तरतुदीनुसार आरक्षण विकास आराखड्याशी सुसंगत असल्यास शहरातील जमिनीवरील गायरान नोंदी कमी करुन त्या जमिनीवरील अतिक्रमणे नियमानुकूल करणे तसेच आरक्षण विकास आराखड्याशी सुसंगत नसल्यास अतिक्रमण नियमानुकूल करण्यासाठी आरक्षण बदलाचे प्रस्ताव सादर करणे इत्यादी कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच पात्र लाभार्थ्यांना पट्टे वाटप मोहीम अंतर्गत शासकीय जमिनी वाटप केलेल्या/अतिक्रमण यमानुकूल केलेल्या लाभार्थ्यांना जमिनीचे पट्टे वाटप करण्यात येणार आहेत.
तिसरा टप्पा – “नाविन्यपूर्ण उपक्रम” २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या टप्पा अंतर्गत या कालावधीमध्ये जिल्हाधिकारी यांनी स्थानिक गरजा, भौगोलिक परिस्थितीचा विचार करुन अधिकाधिक “नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी उपविभागीय अधिकारी सर्व तहसिलदार सर्व तसेच संबंधित शासकीय यंत्रणांना रत्नागिरी जिल्हयामधील अभियान यशस्वीपणे राबविण्याचे अनुषंगाने आज (१ सप्टेंबर) रोजी सभा घेऊन मार्गदर्शन केले.



