मुख्य बातमी

खडतर परिस्थितीत वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणारे डॉ. मनोहर गोरे यांचा सत्कार

रत्नागिरी : ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेत शिक्षण घेऊन आर्थिक परिस्थिती हलाखीची असूनही परिस्थितीवर मात करत रशियामध्ये वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या डॉ. मनोहर महादेव गोरे (एमबीबीएस) यांनी तरुणाईसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. रत्नागिरी तालुक्यातील हर्चे गोरे वाडी आणि गोरे घराण्यातील वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणारे डॉ. मनोहर गोरे यांचा या यशाबद्दल नुकताच सत्कार करण्यात आला. डॉ. मनोहर गोरे यांच्यासह त्यांचे वडील महादेव जानु गोरे, आई सौ. मेघा महादेव गोरे यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.

मनोहर गोरे यांचे प्राथमिक शिक्षण (पहिली ते सातवी) जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा हर्चे नं. १ येथे झाले असून, श्री संत तुकाराम महाराज वारकरी शिक्षण संस्था सोलापूर येथे वारकरी सांप्रदायिक शिक्षण घेऊन अनेक कीर्तने, प्रवचने महाराष्ट्राच्या व्यासपीठावर केली. इयत्ता आठवी हे वर्ष गोडबोले विद्यालय कामती (सोलापूर) येथे पूर्ण करून नववी ते बारावीपर्यंतचे शिक्षण हर्चे येथील बॅ. नाथ पै विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेज येथे पूर्ण केले.

अथक परिश्रमानंतर रशियातील पर्म स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटी येथे प्रवेश घेऊन एमबीबीएस हे वैद्यकीय क्षेत्रातील उच्च शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर भारतात येऊन एफएमजीई ही परीक्षा उत्कृष्ट गुणांनी उत्तीर्ण केली. त्याचसोबत अध्यात्मिक गोष्टी आवड म्हणून भजनात गायन करणे, मृदंग वाजवणे यांसारखी कला परदेशात सुद्धा जोपासण्याचे काम त्यांनी केले.

या सत्कार सोहळ्याप्रसंगी सकल धनगर मल्हार सेना रत्नागिरीचे जिल्हाप्रमुख आणि आई प्रतिष्ठानचे प्रमुख अमृत अंकुश गोरे, अंकुश गोरे, सौ. अंकिता अंकुश गोरे, लहू गोरे, सौ. ललिता गोरे, मंदार गोरे, दीपिका गोरे, केशर गोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना अमृत गोरे म्हणाले, डॉ. मनोहर गोरे यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. त्यांची मेहनत ही मी जवळून पाहिली असून, त्यांचा संघर्ष हा खूप मोठा आहे. त्यांच्यासारखे मेहनती, प्रामाणिक आणि कामाप्रती निष्ठा असणारे वैद्यकीय अधिकारी तसेच प्रशासकीय अधिकारी समाजात मोठ्या संख्येने बनने गरजेचे असून, समाजाच्या विकासासाठी या पुढे आपण पुढाकार घेणार असल्याचे गोरे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!