जे. के. फाईल्स कारखान्याच्या जमीन विक्रीत गोलमाल : बाळ माने
१६० कोटी रुपयांच्या किंमतीची जमीन केवळ ४५ कोटी रुपयांत विकण्यात आल्याचा आरोप

रत्नागिरी : एमआयडीसी परिसरातील बंद पडलेल्या जे. के. फाईल्स कारखान्याच्या जमीन विक्रीत मोठा गोलमाल असून हा घोटाळा कोट्यवधी रुपयांचा असल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपनेते आणि माजी आमदार बाळ माने यांनी केला आहे.
या प्रकरणात जवळपास १६० कोटी रुपयांच्या किंमतीची जमीन फक्त ४० ते ४५ कोटी रुपयांत विकण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या घोटाळ्यामुळे हजारो कामगार बेरोजगार झालेच, पण रत्नागिरी जिल्यातील अर्थकारणाला याचा मोठा फटका बसल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. रत्नागिरीत काल (२ नोव्हेंबर) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, बिपीन शिवलकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.
श्री. माने म्हणाले, “रत्नागिरीत सुमारे चाळीस वर्षांपूर्वी सिंघानिया ग्रुपचा जे. के. फाईल्स हा कारखाना उभारण्यात आला होता; मात्र, काही वर्षांपूर्वी कामगार संघटना आणि मालकांच्या संगनमताने हा कारखाना बंद करण्यात आला. त्यामुळे शेकडो कामगार बेरोजगार झाले आणि त्यानंतर या साडे सोळा एकर जमिनीचा कवडीमोल भावात व्यवहार करण्यात आला.”
या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी माजी आमदार माने यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. तसेच, “या संदर्भात आम्ही उद्योग विभागाचे सचिव आणि सल्लागार यांची प्रत्यक्ष भेट घेणार आहोत,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
“ही जमीन औद्योगिक उद्देशाने देण्यात आली होती. त्यामुळे या ठिकाणी व्यावसायिक किंवा निवासी प्रकल्प उभारणे चुकीचे ठरेल. या जागेवर नव्या उद्योगाची स्थापना करून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी आमची ठाम मागणी आहे,” असे त्यांनी सांगितले.



