एस. पी. हेगशेट्ये महाविद्यालयात डॉ. एस. आर. रंगनाथन जयंतीनिमित्त पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन

रत्नागिरी : भारतीय ग्रंथालयशास्त्राचे जनक पद्मश्री डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त येथील एस. पी. हेगशेट्ये कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये १२ ऑगस्ट रोजी पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गवाळे यांनी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या कार्याची व ग्रंथालय क्षेत्रातील योगदानाची माहिती विद्यार्थ्यांना दिली. त्यांनी विद्यार्थ्यांनी नियमित वाचन करून आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावाव्यात, असे आवाहन केले.
पुस्तक प्रदर्शनात विविध विषयांवरील निवडक पुस्तके तसेच संदर्भग्रंथ विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणे, दर्जेदार साहित्याची ओळख करून देणे आणि महाविद्यालयात वाचनसंस्कृती रुजविणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता.
महाविद्यालयाच्या ग्रंथालय प्रमुख मेघना पोरे तसेच राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभाग प्रमुख प्रा. सुशील साळवी यांनी पुढाकार घेत आणि त्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे व सहकार्यामुळे पुस्तक प्रदर्शनाचा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वी झाला.
या उपक्रमास कला व वाणिज्य शाखेतील प्राध्यापक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी प्रदर्शनातील विविध पुस्तकांची उत्सुकतेने पाहणी केली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना अवांतर वाचनाची प्रेरणा मिळून त्यांच्या ज्ञानवृद्धीस निश्चितच हातभार लागला.



