मुख्य बातमी

रत्नागिरीत पालकमंत्र्यांच्या हस्ते बालकाला डोस पाजून राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा शुभारंभ

जिल्ह्यातील ५८ हजार बालकांना डोस पाजण्याचे उद्दिष्ट

रत्नागिरी : ‘दोन थेंब प्रत्येकवेळी, पोलिओवर विजय दरवेळी’ हा संदेश देत येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते बालकाला पोलिओचा डोस पाजून राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा आज (२८ जून) शुभारंभ करण्यात आला.

याप्रसंगी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

जागतिक आरोग्य संघटनेने १९८८ मध्ये पोलिओ निर्मूलनाचे ध्येय निश्चित केल्यानंतर महाराष्ट्रात १९९५ पासून ही मोहीम सातत्याने राबवली जात आहे. भारतात १३ जानेवारी २०११ नंतर एकही पोलिओ रुग्ण आढळलेला नाही. मार्च २०१४ मध्ये भारताला पोलिओमुक्त देशाचे प्रमाणपत्र मिळाले आहे. हाच स्तर कायम राखण्यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने जय्यत तयारी केली आहे.

जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागासाठी तयार करण्यात आलेल्या मायक्रो प्लॅननुसार नियोजन करण्यात आले आहे. ० ते ५ वर्षे वयोगटातील एकूण ५८,८१५ लाभार्थी असून, ग्रामीण भागात ५६,६२९, तर शहरी: २,१८६ बालकांचा समावेश आहे.

जिल्हाभरात एकूण १,६५९ पल्स पोलिओ बुथ लावण्यात आले आहेत. यासाठी एकूण ३,४७७ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून, ३४६ पर्यवेक्षकांद्वारे कामावर देखरेख ठेवली जात आहे. त्याचप्रमाणे दुर्गम आणि तात्पुरत्या वस्त्यांसाठी १५० मोबाईल टीम्स कार्यरत आहेत. रेल्वे स्टेशन, बस स्थानके आणि चेक पोस्ट अशा गजबजलेल्या ठिकाणी ३४ ट्रान्झिट टीम्स सज्ज ठेवण्यात आल्या आहेत, जेणेकरून प्रवासात असलेले एकही मूल लसीकरणापासून वंचित राहणार नाही.

आज मुख्य बुथवर लसीकरण झाल्यानंतर, पुढील काही दिवस विशेष मोहीम राबवली जाणार आहे. ग्रामीण भागात आगामी ३ दिवस आणि शहरी भागात आगामी ५ दिवस आरोग्य पथके घरोघरी भेट देणार आहेत. या कालावधीत मोहिमेच्या दिवशी (आज) बुथवर डोस न मिळालेल्या उर्वरित बालकांना शोधून त्यांना पोलिओची लस पाजली जाईल. यासाठी जिल्ह्यात ४ लाख ३७ हजार ८९१ घरांचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

पोलिओमुक्त देश संकल्पात योगदान द्या : पालकमंत्री डॉ. सामंत

जिल्ह्यातील पालकांनी ५ वर्षांखालील आपल्या प्रत्येक बालकाला पोलिओचे दोन थेंब पाजून, या राष्ट्रीय मोहिमेत सक्रिय सहभाग घ्यावा आणि देशाला पोलिओमुक्त ठेवण्याच्या संकल्पात आपले योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री डॉ. सामंत यांनी केले आहे.

आरोग्य विभागाने लस वाहक, बर्फाचे पाकीट (Ice Packs) आणि शीत साखळी (Cold Chain) व्यवस्था पूर्णपणे सज्ज ठेवली असून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आठल्ये यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!